
रत्नागिरी रोझ सोसायटीतर्फे वार्षिक गुलाब पुष्पप्रदर्शन
रत्नागिरी रोझ सोसायटीतर्फे
वार्षिक गुलाब पुष्पप्रदर्शन
रत्नागिरी, ता. २८ः ‘रोझ सोसायटी रत्नागिरी'' यांच्यातर्फे येत्या ८ जानेवारी २०२३ ला येथील गोदूताई जांभेकर महिला विद्यालय, बसस्टॅण्डसमोर, रत्नागिरी येथे गुलाबपुष्प प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाबरोबरच विविधरंगी गुलाब, शोभिवंत कुंड्या (पुष्पसहित व पुष्पविरहित), हँगिंग कुंड्या, फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी, पुष्परचना, रांगोळी वापरून काढलेली फुले इत्यादींच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे व ट्रॉफीज ठेवण्यात आल्या आहेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी शिल्पा पानवलकर, सुप्रिया बेडेकर यांच्याशी अधिक माहितीसाठी आणि जर कोणाला रोझ सोसायटीचा मेंबर व्हायचे असेल त्यांनी संपर्क साधावा. या प्रदर्शनात सहभाग घेणाऱ्यांनी गुलाबांची कापणी व मशागत ३५ ते ४० दिवस आधी करणे आवश्यक आहे. म्हणजेच प्रदर्शनाच्या दिवशी फुले उपलब्ध होतील, असे रोझ सोसायटीतर्फे कळवले आहे.
प्रदर्शनात भाग घेणाऱ्यांनी व स्पर्धकांनी सकाळी साडेआठ वाजता महिला विद्यालयात उपस्थित राहावयाचे आहे. फुलांचे व कुंड्यांचे परीक्षण होऊन १२ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होईल. प्रदर्शन सर्व जनतेसाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत खुले राहील. रत्नागिरीतील सर्व नागरिकांनी प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रोझ सोसायटीतर्फे अध्यक्ष सुधीर मुळये यांनी केले आहे.