खासदार संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत

खासदार संजय राऊत

sakal_logo
By

खासदार संजय राऊत यांना
बेळगाव न्यायालयाचा समन्स

सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना; १ डिसेंबरला होणार सुनावणी

बेळगाव, ता. २८ ः शिवसेना नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना बेळगावच्या जेएमएफसी चतुर्थ न्यायालयाने समन्स बजावले आहे. १ डिसेंबर रोजी न्यायालयात होणार असलेल्या सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. राऊत यांच्यासह बेळगावातील अन्य दोघांना न्यायालयाने हे समन्स बजावले आहे. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. दोन्ही राज्यांतील नेत्यांकडून यासंदर्भात आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशा स्थितीत १ डिसेंबरला राऊत बेळगावच्या न्यायालयात हजर राहणार का? याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.
३० मार्च २०१८ रोजी श्री. राऊत हे बेळगावातील कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होती. त्या कार्यक्रमातील राऊत यांच्या भाषणातील काही मुद्द्यांवर आक्षेप घेत कर्नाटक पोलिसांनी टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. त्या प्रकरणाची चौकशी करून टिळकवाडी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्या प्रकरणाची सुनावणी आता सुरू झाली आहे. कर्नाटक सरकार विरूद्ध संजय राऊत असा हा दावा आहे. या दाव्यात राऊत यांच्यासह तिघे प्रतिवादी आहेत. त्या तिघांनाही न्यायालयाने समन्स बजावले आहे.
संजय राऊत २०२१ साली पुन्हा बेळगावात आले होते. एप्रिल २०२१ मध्ये बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली होती. त्या पोटनिवडणुकीत शुभम शेळके हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार होते. शेळके यांच्या प्रचारासाठी राऊत बेळगावात आले होते. त्यावेळी बेळगाव शहरातील संयुक्त महाराष्ट्र चौकात त्यांची सभा झाली होती. न्यायालयीन सुनावणीसाठी पुन्हा त्यांना बेळगावात यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये उत्सुकता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्‍ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर आपला हक्क सांगितल्यावर त्याला राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले होते.