
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या 18 फेब्रुवारीला
शिक्षकांच्या बदल्या १८ फेब्रुवारीला
नव्याने कार्यक्रमः रिक्त पदांची यादी २९ ला
रत्नागिरी, ता. १ ः प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाइन बदल्यांचे वेळापत्रक राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत वारंवार बदलले जात असून सलग तिसऱ्यांदा वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे १८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत शिक्षक बदल्यांचा नवा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
नवीन वेळापत्रकानुसार बदलीपात्र व बदली अधिकारप्राप्त याद्या तसेच विशेष संवर्ग १ व २ यांच्या याद्या शिक्षणाधिकारी जाहीर करणार आहेत. ३ डिसेंबरपर्यंत शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करणे, १० डिसेंबरपर्यंत अपील मंजूर करणे किंवा नाकारणे, १९ डिसेंबरला पुन्हा याद्या जाहीर होणार असून २० ते २३ डिसेंबरदरम्यान भाग १ साठी प्राधान्यक्रम भरता येणार आहे. २९ ला रिक्त पदांची यादी प्रकाशित केली जाईल. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी २०२३ पर्यंत विशेष संवर्ग भाग २ साठी प्राधान्यक्रम भरता येईल. ८ जानेवारीपर्यंत बदल्या करून ९ ला रिक्त पदांची यादी प्रसिद्ध होईल. बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना १० ते १४ जानेवारीपर्यंत प्राधान्यक्रम वभरावयाचा आहे. १६ ते १९दरम्यान बदलीप्रक्रिया होईल. २० ला रिक्त पदांची यादी जाहीर होईल. बदलीपात्र शिक्षकांना २१ ते २४ जानेवारीदरम्यान प्राधान्यक्रम भरता येईल. २५ ते २९ दरम्यान बदली होईल. ३० जानेवारीला रिक्त पदांची यादी जाहीर होईल. विस्थापितांना ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत पर्याय भरता येईल. ४ ते ७ दरम्यान बदली होईल तर ८ ला रिक्त पदे जाहीर होतील. १० वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेल्यांची ९ फेब्रुवारीला यादी प्रसिद्ध होईल. १० ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याचा राउंड व १४ ते १७ दरम्यान बदली प्रक्रिया होईल. १८ फेब्रुवारीला बदल्यांचे आदेश प्रकाशित होतील.
चौकट
दिरंगाई केल्यास कारवाई
बदलीप्रक्रियेच्या कामात दिरंगाई केली तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून देण्यात आला आहे. जिल्हांतर्गत बदल्याबाबतची कार्यवाही वेळापत्रकाप्रमाणे राबवण्यात येणार आहे. बदलीच्या अनुषंगाने करावयाची सर्व कामे दिलेल्या कालावधीतच पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. त्यानुसारच कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या आहेत.