सिंधुदुर्गातील महिला कर्जफेडीत प्रामाणिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गातील महिला कर्जफेडीत प्रामाणिक
सिंधुदुर्गातील महिला कर्जफेडीत प्रामाणिक

सिंधुदुर्गातील महिला कर्जफेडीत प्रामाणिक

sakal_logo
By

सिंधुदुर्गातील महिला कर्जफेडीत प्रामाणिक

बचतगटांमुळे सिद्ध; १२६ कोटी कर्जापैकी ९९.२ टक्केची परतफेड

विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २६ ः सिंधुदुर्ग उधारी ठेवणारा जिल्हा नाही. या जिल्ह्यातील नागरिक अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कर्ज कमी घेतात. घेतलेच तर त्याची परतफेड केल्याशिवाय राहत नसल्याचे कर्जमुक्ती योजनेत उभ्या महाराष्ट्रात सिद्ध झाले आहे. त्याचाच प्रत्यय महिला बचतगटांच्या कारभारातून येत आहे. जिल्ह्यातील ८ हजार ७३२ बचतगटांनी १२६ कोटी ३३ लाख ८४ हजार रुपयांचे आतापर्यंत कर्ज घेतले होते. त्यातील ९९.०२ टक्के कर्जाची परतफेड नियमित झाली आहे. थकबाकी राहिलेल्या कर्जाची टक्केवारी एक टक्का सुद्धा नाही. यावरून जिल्ह्यातील गोरगरीब महिलाही उधारी ठेवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्यात उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ही योजना राबविली जात आहे. यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. व्यवसायाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती साधली जात आहे. बचतगटाच्या महिलाना प्रशिक्षित करून त्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. व्यवसायासाठी लागणारे भांडवल ७ टक्के व्याजाने कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या बचतगट महिलांना व्याजाची रक्कम शासन परत करीत आहे. त्यामुळे एकप्रकारे बिनव्याजी कर्ज दिले जात आहे. याचा फायदा घेत ग्रामीण महिला बचतगट समूहाच्या माध्यमातून कर्ज घेवून विविध व्यवसाय करीत आहेत. अशाप्रकारे कर्ज घेवून व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या हजारोंच्या संख्येत आहे. ही संख्या वाढतच आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा मुळात व्यावसायिक जिल्हा म्हणून तसा परिचित नाही. येथील पुरुष मंडळी सुद्धा व्यावसायिक नाही. अलीकडे यात काही प्रमाणात हा कल वाढत आहे. मात्र, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील केवळ मुल आणि चूल सांभाळणाऱ्या महिलांना मात्र वेगळीच चटक लागली आहे. ती चटक आहे व्यवसायाची. आपल्या परिसरात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या कच्चा मालावर प्रक्रिया करून ते उत्पादन या महिला बाजारात उपलब्ध करीत आहेत. उत्पादित केलेल्या मालाला महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने या महिला अधिक वेगाने यात ओढल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण महिला समूह उद्योजिका म्हणून उदयास येत आहेत. हे व्यवसाय करण्यासाठी जिल्ह्यातील बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७३२ बचतगट समूहांना १२६ कोटी ३३ लाख ८४ हजार रुपये एवढे कर्ज वितरण करण्यात आले आहे. यातील ८ हजार ६४६ महिला समूहांनी नियमित कर्जफेड केली आहे. केवळ ८६ समूहांनी नियमित कर्जफेड केलेली नाही. १२६ कोटी ३३ लाख ८४ हजार पैकी १२५ कोटी ८० लाख ६७ हजार रुपयांची नियमित कर्जफेड झाली आहे. केवळ ५३ लाख १७ हजार रुपयांची नियमित कर्जफेड झालेली नाही. ज्या ८६ बचतगट समूहांनी नियमित कर्जफेड केलेली नाही त्याची टक्केवारी ०.९८ टक्के एवढी आहे. म्हणजे थकबाकीदार संख्या एक टक्का सुद्धा नाही. तर थकीत कर्ज रक्कम टक्केवारी ०.४२ टक्के आहे. म्हणजे थकित रक्कम टक्केवारी अर्धा टक्का सुद्धा नाही. यामुळे ग्रामीण भागातील महिला केवळ अनुदान लाटण्यासाठी बचतगट समूह स्थापन करीत नसून व्यवसायासाठी घेतलेले कर्ज व्याजासह विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांना अनुदान लाटायचे नाही तर व्यावसायिक म्हणून उदयास यायचे आहे, हेच यातून सिद्ध होते.
---------
कोट
ज्या ८६ बचतगटांनी ५३ लाख १७ हजार रुपयांची रक्कम बँकेला परत केलेली नाही. कर्जफेड केलेली नाही. त्या बचतगटांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत कर्ज घेतलेले नाही. महिला आर्थिक विकास महामंडळ, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार या अंतर्गत कार्यरत असताना घेतले आहे. मात्र, बचतगट म्हणून बँकांच्या खात्यात ती थकबाकी दिसत आहे. अन्यथा कर्जफेड १०० टक्के आहे.
- वैभव पवार, सिंधुदुर्ग अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
-----------
कोट
जिल्ह्यातील बचतगट समूह घेतलेले कर्ज नियमित फेडत असल्याने जिल्ह्यातील बँकांचा विश्वास बसला आहे. परिणामी जिल्ह्यातील बँका आता बचतगट समूहांना कर्ज देण्यास उत्साही आहेत. कर्ज वितरण करण्यासाठी विविध बँका आता आपल्या स्तरावर मोहीम राबवित आहेत. ही जमेची बाजू आहे. त्यामुळे आता बचतगट समूहांना आता पहिल्या सारखे कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत नाहीत.
- राजेंद्र पराडकर, अभियान सह संचालक
------------
चौकट
बँक ऑफ इंडियाचे योगदान
आतापर्यंत बचतगट समूहांना झालेल्या कर्ज वितरणात कर्ज रक्कम वितरणात सर्वाधिक योगदान बँक ऑफ इंडिया बँकेचे राहिले आहे. १९९८ समूहांना ४० कोटी ७० लाख २३ हजार रुपये कर्ज वितरण केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने सर्वाधिक समूहांना कर्ज वितरण केले आहे. २ हजार १२८ समूहांना १५ कोटी ८७ लाख ३८ हजार कर्ज वितरण केले आहे. एच डी एफ सी बँकेने एक हजार ४३ समूहांना २४ कोटी १२ लाख ८४ हजार कर्ज वितरण केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने एक हजार ७ समूहांना ७ कोटी ३९ लाख ४ हजारांचे कर्ज वितरण केले आहे.
-----------
बँक*कर्जदार समूह*कर्ज रक्कम(लाखात)*थकित संख्या*थकित रक्कम(लाखात)
बँक ऑफ बरोडा*२१६*३७१.४४*४*३.०२
बँक ऑफ इंडिया*१९९८*४०७०.२३*२८*२१.३२
बँक ऑफ महाराष्ट्र*२१२८*१५८७.३८*२१*४.४३
कॅनरा बँक*२४४*३१२.०७*३*६.१३
सेंट्रल बँक ऑफ इंडिया*१८५*४१९.०५*०*०
आयडीबीआय बँक*५०*२३९.५०*०*०
स्टेट बँक ऑफ इंडिया*२६९*४२१.७६*८*२.१३
युको बँक*२*३.०६*०*०
युनियन बँक ऑफ इंडिया*४६७*५६८.९९*१२*१४.०८
विदर्भ कोकण ग्रामीण बँक*७३४*८३१.६४*६*१.४५
एचडीएफसी बँक*१४३२*२३१२.८४*२*०.१७
आयसीआयसी बँक*३८९*६५६.४८*२*०.४४
सिंधुदुर्ग जिल्हा बँक*१००७*७३९.४०*०*०