
राज्ञी कुलकर्णी, भक्ती पाटणकर प्रथम
65892
देवगड ः येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
राज्ञी कुलकर्णी, भक्ती पाटणकर प्रथम
देवगडची निबंध स्पर्धा; संविधान दिनानिमित्त केले होते आयोजन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ ः येथील दिवाणी न्यायालयातर्फे संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील पाचवी ते सातवीच्या गटात राज्ञी कुलकर्णी तर आठवी ते दहावीच्या गटात भक्ती पाटणकर प्रथम आली. दोनही गटातील निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी न्यायाधीश सुनील वाळके यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. येथील दिवाणी न्यायाधीश सुनील वाळके यांनी, संविधानाला विशेष महत्व असल्याचे सांगून संविधानामधील नागरिकांना दिलेले अधिकार व कर्तव्य यांची माहिती सर्वांना असायला हवी असे सांगितले. अॅड. आरती खाडीलकर यांनी संविधानाची प्रास्ताविका सांगितली. ज्येष्ठ शिक्षिका निशा दहिबांवकर यांनी संविधानाविषयीची माहिती दिली. संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधानामधील महत्वपूर्ण बाबी, संविधान कधी अस्तित्वात आले या संदर्भातील विवेचन केले. याप्रसंगी दिवाणी न्यायालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन गटातील निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना न्यायाधीश श्री. वाळके यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेतील पाचवी ते सातवीच्या गटात अनुक्रमे, राज्ञी विवेक कुलकर्णी, अलीजा तौफिक शेख, योगिनी संजय मिस्त्री पहिल्या तीन आल्या. तसेच आठवी ते दहावीच्या गटात भक्ती विठ्ठल पाटणकर, यश्वी रवींद्र कोयंडे, ऋतुजा उमेश मोहिते पहिल्या तीन आल्या. या स्पर्धेच्या निकालाचे वाचन अॅड. गिरीश भिडे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक संजीव राऊत, पर्यवेक्षक सुनील घस्ती, देवगड न्यायालयातील वकील व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. पर्यवेक्षक सुनील घस्ती यांनी प्रास्ताविकामध्ये संविधानाचे महत्व सांगतानाच घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.