
‘पशुसंवर्धन’साठी २९३ लाभार्थींची निवड
KOP21K11611-1
KOP19I33682
‘पशुसंवर्धन’साठी २९३ लाभार्थिंची निवड
डॉ. विद्यानंद देसाई ः १ कोटी २१ लाख रुपये निधीची सुधारीत अंदाजपत्रकीय तरतूद
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १ ः जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत २०२२-२३ मध्ये विविध योजना राबविण्यासाठी १ कोटी २१ लाख ५ हजार ३०० रुपये निधीची सुधारीत अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या ६ योजनांसाठी ५० लाख ४८ हजार तरतूद आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी एकूण ६५९ प्रस्ताव प्राप्त असून त्यापैकी २९३ लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांनी आज ही माहिती दिली.
जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या पशुसंवर्धन विभागामार्फत २०२२-२३ या आर्थिक वर्षात विविध योजनांसाठी जिल्हा परिषद स्वउत्पन्नाचे १ कोटी २१ लाख ५ हजार ३०० रुपयांचे सुधारीत अंदाजपत्रक तयार केले आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनांसह अन्य योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा, यासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या ६ योजनांसाठी एकूण ५० लाख ४८ हजार रुपये निधीची तरतूद आहे. या निधीतून प्राप्त ६५९ प्रस्तावांपैकी निधीच्या तरतुदीनुसार २९३ लाभार्थींची निवड केली आहे.
यामध्ये शेळी गट वाटप-१० लाख तरतूद, प्राप्त १४५ पैकी ३३ लाभार्थींची निवड, अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा-२५ लाख निधीची तरतूद, प्राप्त १८९ पैकी ६२ प्रस्तावांची निवड, फॅट टेस्टिंग मशीनचा पुरवठा करणे-२ लाख ४३ हजार तरतूद, प्राप्त ६ प्रस्तावांची निवड केली, कडबाकुट्टी मशीन पुरविणे-२ लाख ५५ हजार तरतूद, प्राप्त ४४ पैकी २० प्रस्तावांची निवड, महिला सबलीकरणासाठी ७५ टक्के अनुदानावर सुधारीत जातीची एक दिवशीय ५० कुक्कुट पिल्लांचा गट व पशुखाद्य पुरविणे-३ लाख ५० हजार तरतूद, प्राप्त १८७ पैकी १५५ लाभार्थींची निवड, महिला सबलीकरणासाठी ७५ टक्के अनुदानावर शेळी गट (५ शेळ्या १ बोकड ) पुरविणे-७ लाख निधीची तरतूद, प्राप्त ९४ पैकी २३ प्रस्तावांची निवड केली आहे. अशा एकूण ६५९ पैकी २९३ लाभार्थींची निवड केली आहे, अशी माहिती देतान डॉ. देसाई यांनी दिली.
---
इतर तरतूद अशी...
या व्यतिरिक्त पशू प्रथमोपचार केंद्र दुरुस्तीसाठी ६ लाख ४९ हजार ९०० रुपये, औषध खरेदीसाठी १० लाख, पशु-पक्षी प्रदर्शन व प्रचारासाठी ३९ लाख, पशू दवाखान्यास आवश्यक साहित्य पुरविण्यासाठी २ लाख, पशु दवाखान्यांना जीवनसत्व व औषध पुरविणे १० लाख, पशू संस्थांचे बळकटीकरण ३ लाख, मृत जनावरांची खडड्यात पुरून विल्हेवाट लावणे-७ हजार रुपये अनुदानाची तरतूद सुधारीत अंदाज पत्रकात करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. देसाई यांनी दिली.
...............
कोट
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्व योजनांसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाले आहेत; मात्र मर्यादित निधी तरतूद असल्याने सर्व लाभार्थींना एकाच वेळी लाभ देता येणार नाही. अधिकचा निधी मिळाल्यास आणखी काही लाभार्थींना लाभ देता येईल.
-डॉ. विद्यानंद देसाई, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी