
योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
65894
सिंधुदुर्गनगरी : येथे आयोजित कार्यशाळेत सहभागी अधिकारी व समाज प्रतिनिधी.
योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
अरविंद वळंजू ः सिंधुदुर्गगरीत ‘समता पर्व’ अंतर्गत कार्यशाळा
ओरोस, ता. १ ः समाज कल्याणच्या विविध योजना आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी तालुकास्तरावर सक्षम यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर समाज कल्याण विभागाकडून योजनांबाबत योग्य माहिती मिळाल्यास त्याचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोचू शकतो, असे प्रतिपादन निवृत्त अधिकारी सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळंजू यांनी केले.
सामाजिक न्याय विभाग व बार्टी यांच्यातर्फे राज्यात ‘समता पर्व’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्गगरी येथे अनुसूचित जाती घटकांसाठी कार्य करणारे कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांची ‘अनूसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा’ या विषयावर कार्यशाळा झाली. या कार्यशाळेस जात पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, सामाजिक कार्यकर्ते वळंजू, चंद्रकांत जाधव, विजय चौकेकर, सहायक लेखाधिकारी भालचंद्र कापडी, समाज कल्याण निरीक्षक अनिल बोरीकर, सुनील बागुल, चित्रांगी तोरसकर, धनलता चव्हाण, शिल्पा अमरे, सृष्टी रेवाळे आदी उपस्थित होते. कार्यशाळेत जिल्ह्य़ातील समतादूत, महाविद्यालयाचे प्रतिनिधी, वसतिगृहाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. चौकेकर म्हणाले की, ‘‘विद्यार्थ्यांच्या पालक, शिक्षकांना शिष्यवृत्यांसाठी बऱ्याच वेळा धावपळ करावी लागते. त्यामुळे शिष्यवृत्ती प्रकियेमध्ये पारदर्शकता यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लवकरात लवकर लाभ घेता येईल. जात पडताळणी समितीचे आयुक्त जाधव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त चिकणे यांनी कार्यकर्ते व प्रतिनिधींनी मांडलेल्या मतांबाबत सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल.’’ बोरीकर यांनी सूत्रसंचालन केले.