
मडुऱ्यात ‘रेल्वे’ने प्रकल्प आणावा
65940
मुंबई ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बांदा सरपंच अक्रम खान.
मडुऱ्यात ‘रेल्वे’ने प्रकल्प आणावा
सरपंच अक्रम खान ः रेल्वे राज्यमंत्री दानवेंकडे मागणी, १०० एकर जमीन पडून
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः महाराष्ट्राचे शेवटचे रेल्वेस्थानक असलेल्या मडुरा येथे १०० एकर क्षेत्रात रेल्वे प्रशासनाने रोजगाराभिमुख प्रकल्प आणावा. या स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मुंबई येथे केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय संसदीय कामकाज, कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. मंत्री दानवे यांनी देशातील प्रथितयश उद्योगपतींना या ठिकाणी आणून प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले.
दक्षिण भारताला जोडणारा कोकण रेल्वे हा दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असल्याने रेल्वे निर्मिती व दुरुस्ती कारखान्यासाठी त्याचा विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. हा प्रकल्प झाल्यास मडुरा दशक्रोशीसह बांदा शहराला देखील फायदा होणार आहे.
सरपंच खान यांनी मंत्री दानवे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मडुरा रेल्वे स्थानक परिसरात उद्योग आल्यास बांदा दशक्रोशीला त्याचा कसा फायदा होईल, हे रेल्वे राज्य मंत्री दानवे यांना पटवून दिले. आपण येत्या महिन्यात मडुरा रेल्वे स्थानकाबाबत सगळी माहिती घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेईन, असे मंत्री दानवे यांनी आश्वासन दिले. मडुरा रेल्वे स्थानक हे बांदा शहरापासून जवळ असून या प्रकल्पामुळे बांदा शहराला मोठा फायदा होणार आहे.
--
रेल्वे टर्मिनस झालेच नाही
मडुरा येथे रेल्वे टर्मिनस होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने १०० एकर जमीन संपादित केली होती, मात्र कालांतराने राजकीय वादात रेल्वे टर्मिनस रद्द झाले; मात्र संपादित केलेली जमीन अद्याप वापरात नसल्याने या ठिकाणी रोजगाराभिमुख उद्योगधंदे उभारल्यास येथील स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत होणार असल्याचे खान यांनी सांगितले. मंत्री दानवे यांनी सकारात्मकता दाखवत निश्चितच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.