कुणबी जोडोत ग्रामस्थांच्या समस्या, व्यथांचा विस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणबी जोडोत ग्रामस्थांच्या समस्या, व्यथांचा विस्फोट
कुणबी जोडोत ग्रामस्थांच्या समस्या, व्यथांचा विस्फोट

कुणबी जोडोत ग्रामस्थांच्या समस्या, व्यथांचा विस्फोट

sakal_logo
By

rat१p२३.jpg
६५९१७
मंडणगडः कुणबी जोडो अभियानात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या.
---------------
कुणबी जोडोत ग्रामस्थांच्या समस्या, व्यथांचा विस्फोट
आरोग्य केंद्राची दुर्दशा ऐरणीवर; समाजनेत्यांना विचारला जाब
मंडणगड, ता. १ः तालुक्यातील बलदेवाडी येथे सुरू झालेले आरोग्य केंद्र गेली कित्येक वर्षे उद्घाटन होऊनही सुरू नाही. डॉक्टर उपलब्ध नाही परिणामी येथे साध्या उपचारांसाठी २५ किमी लांब मंडणगडला जावे लागते. दुर्गम असलेल्या तालुक्यातील शेवटच्या भागामध्ये डोंगराळ भागातील वस्त्या, शेती आणि इतर कामांच्या वेळेला साप, विंचू यांचा दंश झाल्यानंतर तत्काळ उपचार उपलब्ध नाहीत. गर्भवतींना, वृद्ध, बालकांना प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर लांब जावे लागते, उपचार मिळेपर्यंत वेळ झालेला असतो अशा समस्या आणि व्यथाच ग्रामस्थांनी सामाजिक नेत्यांसमोर मांडल्या.
कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यात सुरू असलेले कुणबी जोडो अभियान ३० नोव्हेंबरला मंडणगडमध्ये कुणबी समाजोन्नत्री संघ मुंबई, कुणबी राजकीय संघटन समितीच्या पदाधिकारी यांचे मंडणगड तालुक्यातील कुंबळे गाव येथे स्वागत झाले. मंडणगड, तुळशी, पाले, देव्हारे, आंबवली आणि बलदेवाडी या ठिकाणी चौक सभा घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील कुणबी बांधवांनी उपस्थित राहून अपेक्षित प्रतिसाद दिला. वेळास, किल्लावाडी, वाल्मिकीनगरमधील कुणबी ग्रामस्थांनी बलदेवाडी येथे समस्या आणि प्रश्नाचा पाढाच वाचून दाखवला.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ यांच्यावतीने या सभेत दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक तणाव निर्माण झाला. संस्थेच्यावतीने कुणबी समाजाच्या हिताचा आणि भवितव्याच्या बाबतीत सुरू असलेल्या विषयावरती भाषण सुरू असताना अचानक ग्रामस्थांमधून स्थानिक समस्या आणि कुणबी गाववस्त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या व्यथा पुढे येऊ लागल्या. तणावपूर्ण उद्भवलेली स्थिती हाताळण्यासाठी सूत्रसंचालक सुनील माळी यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन या आरोग्य केंद्र संबंधित केलेल्या पाठपुरावा संबंधित चर्चा केली असता जिल्हा परिषद सदस्य, आमदार लोकप्रतिनिधिंनी दिलेल्या पोकळ आश्वासनावर लोकांनी संताप व्यक्त केला.
निवृत्त पोलिस अधिकारी रमेश घडवले यांनी ग्रामस्थांना आश्वासकपणे स्वतः पुढाकार घेत संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांना जाब विचारण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपण तालुकास्तरावरती धडक मोर्चा नेण्याचा आणि ही समस्या मार्गी लावण्याचा खात्रीशीर मार्ग सुचवला. या वेळी मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ अध्यक्ष मनोज घागरूम, कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा अध्यक्ष दिनेश सापटे, अॅड. ज्ञानेश्वर मोरे, उद्योजक सुनील शिगवण, उपाध्यक्ष मारूती पालणकर, सुरेश लोखंडे, शंकर कदम, सुरेश घडवले उपस्थित होते.

चौकट
सगळे इकडे धावतात
केवळ निवडणूक आली की, फक्त सगळे इकडे धावतात. इतर वेळेला कोणी वाली नाही, काही ठोस निर्णय विचार होताना दिसत नाही, असमाधानी आणि असंतोष असलेल्या ग्रामस्थांनी हक्काने कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडे, नेत्यांकडे या संबंधित आक्रमक होत या विषयाला तडीस नेण्यासाठी सुचवले. यावर शाब्दिक चकमक झाली. समाजनेते भाई पोस्टुरे यांनी यावर दिलगिरी व्यक्त करत या समस्येला निश्चितपणे निवारण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असे सांगितले.