पान एक-टोल वसुलीचा मुहूर्त टळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-टोल वसुलीचा मुहूर्त टळला
पान एक-टोल वसुलीचा मुहूर्त टळला

पान एक-टोल वसुलीचा मुहूर्त टळला

sakal_logo
By

टीपः swt134.jpg मध्ये फोटो आहे.
L65977
ओसरगाव ः येथील टोल नाक्‍यावर टोल वसुली करणाऱ्या कंपनीचा कुणीही कर्मचारी नसल्‍याने टोल वसुलीचा मुहूर्त टळला आहे.

टोल वसुलीचा मुहूर्त टळला

कंपनीकडून ताबा नाही; कर्मचारी नियुक्‍तीनंतर प्रक्रिया होणार

कणकवली, ता. १ ः मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव आणि हातीवले येथील टोल नाक्यां‍वर आजपासून टोल वसुली सुरू होणार होती. त्‍याबाबतची अधिसूचना राष्‍ट्रीय महामार्ग विभागाने जारी केली होती; मात्र टोल वसुली करणाऱ्या कंपनीने टोल नाक्‍याचा ताबा घेतलेला नाही. त्‍यामुळे टोल वसुलीचा आजचा मुहूर्त टळला आहे. दरम्‍यान, पुढील काही दिवसांत कर्मचारी नियुक्‍त करून टोल वसुली सुरू होण्याची शक्‍यता आहे. टोल वसुलीची सुरुवात होणार असल्‍याने सर्वच राजकीय पक्षांनी आंदोलनाचीही तयारी ठेवली होती, मात्र टोल नाक्‍यावर वसुली करण्यासाठी कुणीही कर्मचारी आला नसल्‍याने राजकीय आंदोलनेही टळली. राजकीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात टोल नाक्‍यावर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
ओसरगाव येथील टोल नाक्‍याचे कंत्राट गणेश गढीया कन्स्ट्रक्‍शन राजस्थान या कंपनीला दिले आहे. हातीवले येथील टोल नाक्‍याचा ठेका नारायण मांजरेकर या कंपनीला दिला आहे. १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून टोल वसुली सुरू होणार असल्‍याची अधिसूचना राष्‍ट्रीय महामार्ग विभागाने काढली होती. त्‍यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये टोल भुर्दंडाबाबत धाकधूक होती. मात्र, प्रत्‍यक्षात टोल नाक्‍यावर कुणीच कर्मचारी नसल्‍याने वाहनचालकांना दिलासा मिळाला. यापूर्वी हैदराबाद येथील एमडी करिमुन्नीसा या कंपनीने जिल्ह्यातील पंचवीस कर्मचारी नियुक्‍त करून टोल नाका सुरू करण्याचा प्रयत्‍न केला होता; मात्र सातत्‍याने राजकीय आंदोलने झाल्‍याने ओसरगाव आणि हातीवले येथील टोल नाके सुरू झाले नव्हते. आता नव्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती, त्‍यांना टोल वसुलीचे प्रशिक्षण दिल्‍यानंतर टोल वसुलीची कार्यवाही सुरू होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. दरम्‍यान, टोल वसुलीबाबत राष्‍ट्रीय महामार्ग विभागाशी संपर्क साधला असता ओसरगाव आणि हातीवले येथील टोल नाके १ डिसेंबरपासून कार्यान्वित करण्याबाबतची वर्कऑर्डर संबधित कंपन्यांना देण्यात आली असल्‍याची माहिती देण्यात आली.
--------------
चौकट
राज ठाकरेंच्या दौऱ्याची धास्ती?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. मनसेने टोल नाक्‍यांना नेहमीच विरोध केला आहे. त्‍यात श्री. ठाकरे हे सिंधुदुर्गात असताना टोल वसुलीची कार्यवाही सुरू झाली, तर नव्याने संघर्ष पेटण्याची शक्‍यता होती. त्‍यामुळे ठाकरेंचा सिंधुदुर्ग-रत्‍नागिरी दौरा आटोपल्‍यानंतर टोल वसुली सुरू होईल, अशीही शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्‍त झाली.