
‘लष्कर व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांना धडे
66035
दोडामार्ग ः येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात एनसीसी दिनानिमित्त उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.
‘लष्कर व्यवस्थापना’चे विद्यार्थ्यांना धडे
दोडामार्गमध्ये उपक्रम; हळबे महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी जाणली सैन्यदलाची कार्यपद्धती
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २ ः येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात एनसीसी दिवस आणि सैन्य व्यवस्थापन कार्य यावर व्याख्यान असा संयुक्त कार्यक्रम झाला. येथे एनसीसी दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात ‘लष्कर व्यवस्थापन’ विषयावर निवृत्त कॅप्टन प्रसाद गवस यांचे व्याख्यान आयोजित केले होते. विद्यार्थ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
एनसीसी दिन २७ नोहेंबरला देशभरात शाळा, महाविद्यालयात साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग येथे छात्र सैनिकांमध्ये देशभक्तीची प्रेरणा आणि नवचेतना निर्माण करण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी प्रसाद गवस यांनी भारतीय सैन्यदलाची कार्यपद्धती आणि संपूर्ण व्यवस्थापन यंत्रणा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. छात्र सैनिकांना आपल्या कार्य नेतृत्वाची आवड आणि अभिमान असणे गरजेचे आहे तरच तो या क्षेत्रात आपले योगदान सकारात्मक पद्धतीने देवू शकतो, असे मत मांडले.
डॉ. सावंत आणि श्री. गवस यांच्या हस्ते छात्र सैनिकांचा बी परीक्षा प्रमाणपत्र आणि रँक देऊन गौरवण्यात आले. त्यात छात्र सैनिक संयोग तोरस्कर, अखिल पालकर यांना बी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि सिनिअर अंडर ऑफिसर रँक देण्यात आली. लक्ष्मण सावंत, शांताराम तेली, यांना बी प्रमाण पत्र आणि ज्युनिअर अंडर ऑफिसर रँक देण्यात आली. अस्मिता सावंत यांना बी प्रमाण पत्र व सर्जंट रँक देण्यात आली.
सर्व छात्र सैनिकांनी ‘हम सब भारतीय है’ या एनसीसी गीताचे सामूहिक गायन केले. लेफ्टनंट प्रा. डॉ. पी. एन. ढेपे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एनसीसीचे लक्ष्य, उद्देश व कर्तव्य याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. प्रा. दिलीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. एस. एस. पाडगावकर यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी आणि छात्र सैनिक अनिकेत गवंडे, ऐश्वर्या परब, प्रणिता खांबल, श्रेया सावंत, सुप्रिया सावंत, अनिरुद्ध शेटकर, आकाश वाघमोरे, पूजा पाटील, गौरी ठाकूर, ऋतिका गवस आदी उपस्थित होते.
--
चौकट
एनसीसीच्या आठवणींना उजाळा
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी शालेय जीवनातील एनसीसीच्या आठवणींना उजाळा देत एनसीसी करिअरच्या दृष्टीकोनातून किती महत्वाचे आहे तसेच एनसीसी बी आणि सी प्रमाणपत्राचे महत्व छात्रसैनिकांना सांगितले. आपल्या संघटन नेतृत्वातून देश आणि समाजाच्या सेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन केले.