
‘जलतरणासाठी’ची दरवाढ मागे घ्या
66037
सावंतवाडी ः येथे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांना निवेदन देताना माजी नगरसेवक. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
‘जलतरणासाठी’ची दरवाढ मागे घ्या
माजी नगरसेवक ः प्रांताधिकारी प्रशांत पानवेकरांना निवेदन, कोंडवाड्याचीही मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः शहरातील जलतरण तलावात जलतरण करण्यासाठी आकारण्यात येणारी वाढीव दरवाढ मागे घेण्यात यावी, या ठिकाणी व्यावसायिककरण करु नये, अशी मागणी माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याजवळ केली.
मोकाट जनावरांसाठी शहरात कायमस्वरूपी कोंडवाड्याची व्यवस्था करावी व तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कोंडवाड्याच्या व्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
शहरातील जलतरण तलाव व कोंडवाडाविषयी माजी नगरसेवकांनी काल (ता.१) प्रांताधिकारी पानवेकर यांची भेट घेतली व चर्चा केली. या संदर्भात निवेदनही सादर केले. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग, उमेश कोरगावकर, अफरोश राजगुरू, अशोक माटेकर, अमोल सारंग आदी उपस्थित होते. झालेल्या चर्चेत येथील पालिकेच्या जिमखाना मैदान येथील स्विमिंग पूल सुरू करण्यात आले असून या ठिकाणी पूर्वी आकारण्यात येणारे २० रुपये फी वाढवून १०० रुपये करण्यात आली आहे. ही दरवाढ सर्व सामान्यांना परवडनारी नसून पूर्वीप्रमाणे वीस रुपये एवढी दर निश्चिती करावी. पालिकेने शहरवासीयांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली असून त्या ठिकाणी व्यावसायिकीकरण होऊ नये तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी यामध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली.
---------
चौकट
कायमस्वरूपी कोंडवाड्याची गरज
शहरात मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता शहरात कायमस्वरूपी कोंडवाड्याची व्यवस्था करण्यात यावी. सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कोंडवाड्याच्या व्यवस्थेबाबत ही पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन पानवेकर यांनी दिले.