
मंडणगड - 53 पुरस्कार विजेती झुंजुमुंजु प्रदर्शित
Rat२p९.jpg
६६०२२
मंडणगडः भिंगलोळी शाळेत झुंजुमुंजु लघुपट पाहताना विद्यार्थी.
-------------
बहुचर्चित ५३ पुरस्कार विजेती झुंजुमुंजु प्रदर्शित
मंडणगडची शॉर्टफिल्म; ३७ फेस्टिव्हलमध्ये सहभाग, शिक्षक, विद्यार्थ्यांचा अभिनय
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २ः विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला ठसा उमटवणारी बहुचर्चित झुंजुमुंजु ही शॉर्टफिल्म २ डिसेंबरला प्रदर्शित झाली. आतापर्यंत ३७ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हमध्ये सहभागी झालेल्या या मंडणगडच्या लघुपटाने विविध विभागातील पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली आहे. प्रेक्षकांना प्रतीक्षा करायला लावणारी ही फिल्म अखेर धर्मी फिल्म प्रॉडकशन या यु ट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. तालुक्यातील अनेक शाळांमधून हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
झुंजुमुंजू लघुपटात समाजातील अंधश्रद्धा, अघोरी प्रथा यांवर शिक्षणाच्या माध्यमातून भाष्य करून जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. या लघुपटाची सुरवात संत गाडगेबाबा यांचे शिक्षणाचे महत्व विशद करणारी कवितेच्या वाचनाने या फिल्मची सुरवात होते. लेखक व दिग्दर्शक गणेश माळी यांनी संवाद, लेखन आणि दिग्दर्शनातून कमी वेळेत नेमका अर्थबोध देणारी ही फिल्म दिली आहे.
शाळेत न जाता शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुलाची ही कथा असून गावात घडणाऱ्या एका विचित्र घटनेमुळे त्याच्यात आमुलाग्र बदल होऊन तो शाळेची वाट धरतो, असा सुंदर संदेश दिला आहे. अनेक प्रसंगातून ग्रामीण जीवनशैली दाखवताना गावाचे, लोकांच्या सामाजिक मानसिकतेचे प्रतिबिंब उमटते. लघुपटाचा शेवट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या सुविचाराने होतो. लघुपटात मुख्य कलाकार रितेश हंबिर, सुभद्रा फुंदे, नरेश गोरे, शांताराम पवार, संभाजी वाफेलकर, धोंडिबा झोरे यांनी अभिनय केला आहे. कॅमेरामन, एडिटिंग अभिषेक पाडेकर तसेच निर्मिती सुशील मोरे, विकास जाधव यांची आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी यामध्ये अभिनय केला आहे.
हा लघुपट परीक्षक, समीक्षकांच्या पसंतीस उतरला असून विविध पुरस्काराने प्रकाशमान ठरला आहे. अंधश्रद्धेच्या कचाट्यात सापडलेल्या लोकांना विज्ञान, सदविवेक बुद्धि, विच्यार्धारित कृती यांचे वावडे असते. परंपरा, जाचक रूढी यांचे स्तोम माजवणे त्यांना आवडते यावर झुंजुमुंजु ही फिल्म भाष्य करते. पंचरत्न व धर्मी प्रोडक्शन प्रस्तुत समाजजागृती करणाऱ्या या शॉर्टफिल्मचे स्वागत होत आहे.