
एड्स रोगाचा अभ्यास आवश्यक
66075
फोंडाघाट ः येथील महाविद्यालय एडस दिनी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्नपूर्णा वालावलकर.
एड्स रोगाचा अभ्यास आवश्यक
डॉ. वालावलकर ः फोंडाघाट महाविद्यालयात एड्स दिनी जागृती
फोंडाघाट,ता. २ ः एड्स रोगावर आपल्याला मात करायची असेल तर त्या रोगाची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरातील होणारे बदलही ज्ञात असले पाहिजेत. आपल्या संस्कृतीत ज्या विषयावर बोलणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळेच अशा रोगात आपण अज्ञानापोटी अडकून पडतो. आत्ताच्या सोशल मीडियाच्या युगात आपण या ज्ञानापासून दूर राहणे योग्य नाही. अशा बाबतीत सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला रोगाचे ज्ञान मिळाल्यास या रोगातून आपल्याला मुक्त होणे सोपे जाते, असे प्रतिपादन फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्नपूर्णा वालावलकर यांनी येथे केले.
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे एन.एस.एस. व एन.सी.सी. विभागातर्फे एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमात डॉ. अन्नपूर्णा वालावलकर बोलत होत्या. याच विषयावर डॉ.अमोल केंद्रे म्हणाले की, ‘‘कोणत्याही गोष्टी लपवून ठेवू नका. त्यामुळे आपल्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. ज्या वयोगटात खूप बदल होतात तेच हे वय आहे. या वयात आपल्याला जीवनाला नीट आकार देता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.’’ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले की, ‘‘आमच्या काळात एड्स हा प्रकार नवीन होता. त्यामुळे त्याची भीती खूप मोठ्या प्रमाणात होती; परंतु अभ्यासानंतर त्याची काळजी कशी घ्यावी हे आम्हाला कळले आणि भीती कमी झाली. आपल्या नैतिक मूल्यांचे पालन केले तर या रोगापासून आपल्याला भीती बाळगण्याची आवश्यकता पडणार नाही. स्वच्छता ही सुद्धा एक काळजी घेण्याची गोष्ट आहे.’’ डॉ.राज ताडेराव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बालाजी सुरवसे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. विनोद पाटील यांनी आभार मानले.