
राजापुरातील गाळ उपशाच्या कामाला गती
rat2p21.jpg
66032
राजापूरः नाम फाउंडेशनचे जलतज्ञ व नॅचरल सोल्युशनचे सीईओ डॉ. अजित गोखले यांचे स्वागत करताना मुख्याधिकारी प्रशांत भोसले. या वेळी उपस्थित महेश शिवलकर, नरेंद्र मोहिते आदी.
-----------------
राजापुरातील गाळ उपशाच्या कामाला गती
डॉ. अजित गोखलेंची पाहणी; अहवालानंतर होणार कामाला सुरवात
राजापूर, ता.२ः नाम फाउंडेशनचे जलतज्ञ व नॅचरल सोल्युशनचे सीईओ डॉ. अजित गोखले यांनी राजापुरात भेट देऊन शहरातील वर्षानुवर्षे गाळाचा संचय झालेल्या अर्जुना आणि कोदवली नदीपात्रांमधील गाळाची पाहणी केली. त्यामुळे नगर पालिका, महसूल प्रशासन आणि नाम फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि लोकसहभागातून होणार्या गाळ उपशाच्या कामाला गती मिळणार आहे.
नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी डॉ. गोखले यांचे स्वागत केले. या वेळी गाळ निर्मुलन समिती सदस्य महेश शिवलकर, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, नगर पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, अभियंता स्वप्नील जड्यार, प्रकाश नाचणेकर आदी उपस्थित होते.
शहरातून वाहणार्या अर्जुना आणि कोदवली नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झाला आहे. या गाळामुळे पावसाळ्यामध्ये सातत्याने पूरस्थिती निर्माण होऊन त्याचा शहराला फटका बसतो. नदीपात्रांमधील साचलेल्या गाळाचा शहर विकासालाही फटका बसतो. त्यामुळे नगर पालिका, महसूल प्रशासनाने लोकसहभागातून गाळाचा उपसा करण्याचा निर्धार बैठकीत राजापूरवासियांनी केला आहे. गाळ उपसा करण्यासाठी आवश्यक असलेल्या लोकनिधीची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. नाम फाउंडेशनने गाळ उपशासाठी तांत्रिक बाबी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी जलसंवर्धन व गाळ उपसा या कामामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे डॉ. गोखले यांनी राजापुराला भेट दिली. या वेळी त्यांनी अर्जुना आणि कोदवली नदीपात्रांसह सायबाच्या धरणामध्ये साचलेल्या गाळाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी अहवालाचा सविस्तर विस्तृत अहवाल ते फाउंडेशनकडे सादर करणार आहेत. त्यानंतर अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता करून या गाळ उपशाबाबत प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होणार असल्याची माहिती डॉ. गोखले यांनी दिली.