साडेसात लाख प्राप्त; अजून २५ लाखांची आवश्यकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेसात लाख प्राप्त; अजून २५ लाखांची आवश्यकता
साडेसात लाख प्राप्त; अजून २५ लाखांची आवश्यकता

साडेसात लाख प्राप्त; अजून २५ लाखांची आवश्यकता

sakal_logo
By

66101

साडेसात लाख प्राप्त; अजून २५ लाखांची आवश्यकता

‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना; आतापर्यंत २५ लाभार्थींना लाभ

सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेच्या सर्व लाभर्थींना लाभ देण्यासाठी सुमारे २५ लाख निधीची गरज असून शासनाकडून केवळ ७ लाख ५० हजार एवढा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव असल्याने प्राधान्य क्रमानुसार लाभ दिला जात आहे. आतापर्यंत २५ लाभार्थींना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी संतोष भोसले यांनी आज दिली.
श्री. भोसले म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ''माझी कन्या भाग्यश्री'' योजनेचा लाभ घेण्यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षात ६० प्रस्ताव प्राप्त आहेत. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ या वर्षात आतापर्यंत नव्याने १४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या सर्व लाभार्थींना लाभ देण्यासाठी सुमारे २५ लाख रूपये निधीची आवश्यकता आहे. मात्र, या योजनेसाठी शासनाकडून गतवर्षी निधी प्राप्त झाला नसल्याने लाभार्थी प्रतीक्षेत होते. यावर्षी शासनाकडून केवळ ७ लाख ५० हजार एवढा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, हा निधी पुरेसा नाही. सर्व लाभार्थींना लाभ देण्यासाठी सुमारे २५ लाख निधीची गरज आहे.’’
ते म्हणाले, ‘‘ही योजना मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंगनिवड प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे, आरोग्याचा दर्जा वाढवणे, यासाठी शासनाने १ ऑगस्ट २०१७ पासून सुधारित योजना लागू केली. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७ लाख ५० हजार पर्यंत आहे, अशा सर्व समाजातील घटकांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेत एका मुलीच्या जन्मानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या मुलीच्या नावे ५० हजारचे मुदत ठेव बचत प्रमाणपत्र केले जाते. दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये अशी ५० हजार रूपये इतकी रक्कम मुलींच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येते.’’
श्री. भोसले पुढे म्हणाले, ‘‘गतवर्षी या योजनेसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे या योजनेचे लाभार्थी लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. आता शासनाकडून या योजनेसाठी ७ लाख ५० हजार एवढा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, सर्व लाभार्थींना लाभ देण्यासाठी हा निधी पुरेसा नाही. त्यासाठी आणखी सुमारे २५ लाख निधीची आवश्यकता आहे. चालू आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये नव्याने प्रस्ताव येत आहेत. आतापर्यंत १४ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. शासनाकडून निधी प्राप्त होईल. त्यानुसार प्राधान्य क्रमानुसार लाभर्थीना लाभ दिला जाणार आहे.’’
---------
चौकट
जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
- २०१७-१८ मध्ये ३४ लाभार्थी
- २०१८-१९ मध्ये ६२ लाभार्थी
- २०१९-२० मध्ये ४८ लाभार्थी
- २०२०-२१ मध्ये ५६ जणांना लाभ
- २०२१-२२ मध्ये ६० लाभार्थींचे प्रस्ताव
- यंदा आतापर्यंत नव्याने १४ प्रस्ताव
---------
चौकट
कोणाला मिळणार लाभ
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०१७ ला जन्मलेल्या व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना देण्यात येतो. एखाद्या कुटुंबात १ ऑगस्ट २०१७ पूर्वी एक मुलगी आहे व त्यानंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास फक्त दुसऱ्या मुलीला २५ हजार रूपये इतका लाभ देण्यात येतो. मात्र, मुलगा जन्मल्यास या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी भोसले यांनी दिली.