
‘जुन्या आठवणी जागवा, व्यक्त व्हा’ सावंतवाडीत
‘जुन्या आठवणी जागवा,
व्यक्त व्हा’ सावंतवाडीत
उपक्रमाचे दहा डिसेंबरला आयोजन
सावंतवाडी, ता. २ ः कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा यांच्यावतीने शहरातील जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा हा उपक्रम १० ला सायंकाळी सहा वाजता श्रीराम वाचन मंदिर समोरील मोती तलावाच्या सेल्फी पॉइंट कट्ट्यावर होणार आहे, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अॅड. संतोष सावंत व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.
संस्थानकालीन पूर्वीची सावंतवाडी आणि सावंतवाडी शहरातील अनेक आठवणी जुन्या जाणत्या व्यक्तीने पाहिल्या आहेत अनुभवले आहेत आता बदलती सावंतवाडी आणि या बदलत्या सावंतवाडीतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या दृष्टीने सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आपली नावे येत्या आठ डिसेंबरपर्यंत सहसचिव राजू तावडे व सचिव प्रतिभा चव्हाण यांच्याकडे नोंदवावीत. जुन्या आठवणी व्यक्त होण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकांनी व साहित्यिकांनी आपली नावे नोंदवली आहेत. पाच मिनिटात सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी अनुभव कथन करायचे आहेत. कार्यक्रम नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, तालुकाध्यक्ष अॅड. संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, अॅड. नकुल पारसेकर, प्रा. रुपेश पाटील, रवी जाधव आदी उपस्थित होते. १० ला सायंकाळी सहा ते आठ या वेळेत श्रीराम वाचन मंदिर जवळील सेल्फी पॉइंट कट्ट्यावर हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. साहित्यप्रेमी, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, विविध संस्था आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.