
रत्नागिरी- माकड, वानरांविरोधात उपोषण
rat2p30.jpg
66062
रत्नागिरी : माकड, वानरांच्या उच्छादाविरोधात उपोषणाला बसलेले अविनाश काळे. त्यांना पाठिंबा देताना भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, सचिन करमरकर. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------
माकड, वानरांविरोधात उपोषण
अविनाश काळेंना शेकडोंचा पाठिंबा; शेतकरी उदध्वस्त, उपद्रवी पशु जाहीर करण्याची मागणी
रत्नागिरी, ता. २ : कोकणात वानर, माकडांच्या उच्छादामुळे हजारो शेतकरी हतबल झाले आहे. कोकणात कधीही कर्जबाजारी होऊन अथवा अन्य कोणत्याही कारणांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही. परंतु आता मिळणारे सारे उत्पन्नच वानर, माकडे पळवत असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे सांगत गोळप येथील शेतकरी अविनाश काळे यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण केले. त्यांना भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्यासमवेत शेकडो नागरिकांनी भेटून पाठिंबा दिला.
गोळप येथील अविनाश काळे यांनी सांगितले की, आंबा, काजू, फणस, कोकम, नारळ, सुपारी बागायती करतो. परंतु सध्या वानर, माकडे यांच्या प्रचंड त्रासामुळे मी आणि कोकणातील माझ्यासारखे हजारो शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. प्रचंड कष्ट करून पैसे खर्च करून डोळ्यासमोर फक्त वानर, माकडे करत असलेले नुकसान बघायची वेळ आली आहे. घरात घुसूनही ते नासधूस करू लागले आहेत. उपोषणापूर्वी हजारो लोकांनी फोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला पाठिंबा दिला आहे.
शासनाने या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वानर, माकडांना मारण्यास बंदी असल्याने गेल्या सुमारे पस्तीस वर्षात यांची संख्या शंभर पटीने वाढली आहे. वानर, माकड यांना उपद्रवी पशू म्हणून जाहीर करून शासनाने त्यांचा बंदोबस्त करावा किंवा हिमाचल प्रदेशप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांसाठी माकड, वानर हे उपद्रवी पशू जाहीर करून त्यांना मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही काळे यांनी केली.
चौकट
वनमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन
कोकणात माकड, वानरांचा उपद्रव प्रचंड होत आहे. सर्व उपाय थकले असून अन्यथा कायदा हातात घेऊन वानर, माकडे मारण्याचा उपाय अमलात आणण्याचा विचार या वर्गात प्रबळ होऊ लागला आहे, त्यामुळे शासनाने या प्रश्नावर तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली. यासंदर्भात त्यांनी अविनाश काळे यांची भेट घेतल्यानंतर पाठिंबा दर्शवला आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शेतकऱ्यांची व्यथा सरकार दरबारी मांडतो, असा विश्वास श्री. काळे यांना दिला आहे.