
स्थलांतरामुळे गावे पडताहेत ओस
66158
स्थलांतरामुळे गावे पडताहेत ओस
नोकरी-व्यवसायानिमित्त तरुणांचा शहराकडे कल
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग ः ता. १ : ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची उणीव, रोजगाराची कमतरता, शैक्षणिक सुविधांच्या गैरसोयीमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण तरुणांचे शहरी भागाकडे आकर्षण वाढले आहे. मुख्यतः रोजगाराच्या शोधात गावे सोडून शहरी भागाकडे स्थलांतरित होणाऱ्या लोकसंख्येमुळे रायगड जिल्ह्यातील गावे ओस पडली आहेत. कोरोनानंतर सर्वच उद्योगांनी कामगार कपात केल्याने ग्रामीण भागात नोकरी मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी शहरांची कास धरली आहे.
रोजगार मेळावे, शेतीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून तसेच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी ओघ वाढतच आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार १० लाख लोकसंख्येपैकी फक्त १ लाख नागरिक शहरी भागात राहत होते. तर आजच्या घडीला जवळपास २९ लाख लोकसंख्येपैकी १५ लाख नागरिक शहरी भागात राहत आहेत. ग्रामीण लोकसंख्या १४ लाखाच्या घरात आहे. कोरोनानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाल्याने नोकरी-व्यवसायाच्या शोधात मुंबई, ठाणे, उपनगरांसह सुरत येथे जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे.
स्थलांतर रोखण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या अहवालानुसार, कोरोनामध्ये सव्वा दोन लाख लोक गावाकडे आली होती, त्यापेक्षाही जास्त लोक आता नोकरी-व्यवसायासाठी शहरात परतली आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार बुडाला, जवळपास वर्षभर घरीच बसावे लागले. या दरम्यान खालावलेली आर्थिक स्थितीतून वर येण्यासाठी दक्षिण रायगडमधील नागरिकांनी शहराकडे धाव घेतली आहे. दक्षिण रायगडमधील महाड, पोलादपूर, म्हसळा, तळा, रोहा तालुक्यातील गावे ओस पडू लागली आहेत. गावाकडे घर आहे; परंतु त्या घरात वयोवृद्ध माणसांशिवाय कोणी राहत नाहीत. कमावत्या व्यक्ती शहरात कामधंद्याच्या शोधात गेल्यावर त्यांच्या पाठोपाठ त्यांनी आपल्या लहान मुलांनाही शिक्षणासाठी स्थलांतरित केले आहे. परिणामी मुंबईपासून जवळ असलेल्या पनवेल, कर्जत, खालापूर, उरण तालुक्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
--
कोट
दक्षिण रायगडमध्ये स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे. हे स्थलांतर दिवसेंदिवस वाढत आहे. ते रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयारी दाखवणे गरजेचे आहे. कोरोना कालावधीत कमी उत्पन्न गटातील बहुतांश स्थलांतरित लोक गावाकडे आले होते. त्यापेक्षाही जास्त लोक आता नालासोपारा, सुरत येथे स्थलांतरित झाले आहेत.
- तुषार इनामदार, जिल्हा समन्वयक स्वदेश फाऊंडेशन