
आंदोलनामुळे कामे पूर्णतः रखडली
आंदोलनामुळे कामे पूर्णतः रखडली
पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित
अलिबाग, ता. २ः पदभरती थांबविल्याने पशुसंवर्धन विभागातील वर्ग तीन व चारमधील कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला तीन दिवस होऊन गेले तरी सरकारने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला असून कार्यालयासह दवाखान्यातील स्वच्छता, प्रशासकीय कामकाज रखडले आहे.
पशुसंवर्धन विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडतो. प्रलंबित मागण्यांसाठी चार दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम थांबले आहे. लम्पीचा अहवाल तयार करणे, मनुष्यबळ माहिती देणे, लम्पीमुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत देण्यासाठी धनादेश देणे अशी कामे ठप्प आहेत. आंदोलनामुळे प्रशासकीय कामासह अन्य कामांवर मोठा परिणाम होऊ लागला आहे.
--
कोट
प्रलंबित मागण्यांसाठी वर्ग तीन व चारमधील कर्मचाऱ्यांनी चार दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आता आंदोलनाची भूमिका बदलली आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची भूमिका स्वीकारली आहे.
- महेश फुलारी, अध्यक्ष, पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ, रायगड
--
वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तांत्रिक कर्मचारी कामावर आहेत. परंतु अन्य कर्मचारी संपावर गेल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारावर व प्रशासकीय कामावर परिणाम होत आहे. कामाचा वेग मंदावला आहे.
- डॉ. रत्नाकर काळे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग