
८५.९० हेक्टरवर कलंगडाची रोहा तालुक्यामध्ये लागवड
PNE20Q48862-1
८५.९० हेक्टरवर कलंगडाची
रोहा तालुक्यामध्ये लागवड
रोहा ः रोह्यात लागवड होणाऱ्या कलिंगडला राज्यासह राजस्थान, गुजरात व कर्नाटक राज्यात मोठी मागणी आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ८५.९० हेक्टर क्षेत्रात कलिंगडची लागवड केली आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून नियोजन करून हे पीक घेतले जात असल्याने शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नही वाढले आहे. रोहा तालुक्यात पारंपरिक शेतीबरोबरच कडधान्य, फळभाज्या, कलिंगड लागवडीचे नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. तालुक्यातील वाशी गावातील मगर बंधूंनी मोठ्या प्रमाणावर कलिंगड पीक घेण्यास सुरुवात केली आहे. कलिंगड पिकाला व्यावसायिक रूप दिले आहे. त्याचे अनुकरण करून तालुक्यातील अन्य शेतकरीही कलिंगडाच्या लागवडीकडे वळू लागले आहेत. योग्य नियोजन, उपलब्ध बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांना कलिंगड पीक फायदेशीर ठरत आहे. तालुक्यातील सुतारवाडी, कोलाड, बाहे, देवकान्हे, सुतारवाडी, धाटाव, चणेरा, यशवंतखार आदी भागात कलिंगड पीक घेतले जात आहे. या वर्षी कलिंगडाच्या लावगडीला सुरुवात झाली आहे. तालुक्यात वाशी गावातील कलिंगडांना जिल्ह्यासह परराज्यातही मोठी मागणी आहे. त्यानुसार पुरवठा करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. कलिंगड व्यवसायामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
----
माकडांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण
दाभोळः वानर, माकडे नसतील तर कोकण समृद्ध होईल. शेतीप्रधान देशात शेतीचे संरक्षण करायचे नाही का? वानर, माकड शेतीचे करत असलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली असून नुकसान भरपाई नको, कायमचा बंदोबस्त हवा. माणूस जगला पाहिजे की प्राणी? हे एकदा ठरवा. वानर, माकडे यांना उपद्रवी पशू घोषित करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी गोळप येथील शेतकरी अविनाश काळे रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी दापोलीतील शेतकऱ्यांनी आज दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन दिले.
-----
अखेर सीटी स्कॅन मशीन सुरू
अलिबाग ः जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन काही दिवसांपासून बंद होती. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले होते. अखेर दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सीटी स्कॅन मशीन सुरू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज किमान दोनशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांना चांगली सेवा मिळावी, तसेच अपघातग्रस्त व अन्य रुग्णांना तातडीने सिटी स्कॅनमार्फत आजाराचे निदान व्हावे, यासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र २३ नोव्हेंबरपासून तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद होती. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. रुग्णांना सिटी स्कॅनसाठी खासगी रुग्णालयात जावे लागल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. अखेर दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सिटी स्कॅन मशीन सुरू करण्यात आली आहे.
---
घाऊक बाजारात बटाट्याची आवक
वाशी : घाऊक बाजारात नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. तरीही बटाट्याचे दर स्थिर असून घाऊक बाजारात नवीन बटाटा १७ ते २० रुपये किलो आहे, तर किरकोळ बाजारात किलोमागे २५ ते ३० रुपयांना विक्री होत आहे. राज्यातील तळेगाव, पुणे येथून हा बटाटा वाशीच्या घाऊक बाजारात येत आहे. आता त्याची आवक सुरू झाली आहे. चवीला चांगला असल्याने ग्राहकांकडून या बटाट्याला मागणी आहे. हॉटेल तसेच इतर ठिकाणी वापरासाठी मात्र जुन्या बटाट्यालाच मागणी आहे. सध्या घाऊक बाजारात नवीन बटाट्याच्या सरासरी दहा गाड्या दररोज येत आहेत, तर जुन्या बटाट्याच्या ६० ते ७० गाड्या येत आहेत. जुन्या बटाट्याचे दर घाऊक बाजारात १८ ते २२ रुपये किलो आहेत. किरकोळ बाजारात हे दर ३० रुपये किलो आहेत. डिसेंबर अखेरपासून परराज्यांतील नवीन बटाटा यायला सुरुवात होईल. त्यानंतर बटाट्याचे दर आणखी खाली येण्याची शक्यता व्यापारी मनोहर तोतलानी यांनी वर्तवली आहे.
--
मुरूड तालुक्यात बिबट्यांची दहशत
अलिबाग : मुरूड तालुक्यातील साळाव येथे बिबट्याची दहशत वाढली आहे. तीन दिवसांत सात ते आठ पाळीव जनावरांना बिबट्याने जखमी केले, तर गुरुवारच्या रात्री दोन वासरे ठार मारली. भक्ष्याच्या शोधात चार ते पाच बिबटे गावाशेजारी फिरत असल्याचे साळावमधील ग्रामस्थांनी पाहिले आहे. साळाव येथे जेएसडब्ल्यू कंपनीतून रात्रपाळी संपवून येणाऱ्या कामगारांनाही अनेक वेळा बिबट्या दिसला आहे. येथील आदिवासी वाडीतील दशरथ वाघमारे यांच्या तीन बकऱ्यांना बिबट्याने भक्ष्य केले; तर कृष्णा पाटील यांच्या गोठ्यातील दोन वासरांना बिबट्याने ठार केले. या घटनेची तक्रार केल्यानंतर मुरूड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पंचनामे केले. ज्या ग्रामस्थांचे नुकसान झाले असेल त्यांना वन विभागाच्या नियमानुसार नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती वनसंरक्षक आप्पासाहेब निकत यांनी दिली.
--------
पेणमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना बढती
वडखळ : पेण तालुक्यातील दादर सागरी पोलिस ठाण्यात कार्यरत श्यामकांत पाटील, प्रसाद पाटील व दत्ता साळवी या तीन हवालदारांना साहायक पोलिस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर पोलिस नाईक मनीष म्हात्रे यांना हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पोलिस शिपाई, हवालदार आणि साहायक पोलिस उपनिरिक्षक संवर्गातील पदांना मान्यता दिली आहे. गृह विभागाच्या आदेशाची रायगडमध्ये पोलिस अधीक्षकांनी अंमलबजावणी सुरू केली आहे.
--
उंबरखिंडीत कामाला गती
खालापूर ः ऐतिहासिक उंबरखिंडीत विकास कामांना वेग आला आहे. रायगड जिल्ह्यात येणारा पर्यटक केवळ समुद्रकिनाऱ्यापुरता मर्यादित न राहता ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटनाकडे देखील आकर्षित झाला पाहिजे, यासाठी समरभूमी उंबरखिंड परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होत आहे. रस्त्याची कामे सुरू आहेत. नदीकिनाऱ्याची धूप रोखण्यासाठी दगडी बांधणी करण्यात येत आहे. पाली-खोपोली राज्य मार्गावरून सह्याद्रीच्या कुशीत असलेली समर उंबरखिंड परिसर कित्येक शिवप्रेमींना माहिती नाही. समरभूमी उंबरखिंड पर्यटन स्थळ व्हावे, यासाठी राज्य सरकारकडून अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. २ एप्रिलला समरभूमीत विजय दिनी असंख्य शिवप्रेमी उंबरखिंडीत येतात. बाराही महिने शिवप्रेमी आणि पर्यटक आल्यास सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कामे सुरू आहेत.
---
‘कोळसा भट्ट्या अढळल्याच नाहीत’
चिपळूणः कोळसा भट्टीला तालुक्यासह जिल्ह्यात कुठेही परवानगी नाही; मात्र तालुक्यातील टेरव वेतकोंड येथे कोळसा भट्ट्या धगधगत असल्याची तक्रार टेरव वेतकोंड येथील एकनाथ माळी यांनी वनविभागाकडे केली होती. तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. वेतकोंड येथे कोठेही कोळसा भट्टी आढळली नसल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तालुक्यातील टेरव येथील कोळसा भट्टीचे प्रकरण नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कोरोनामुळे येथील कोळसा भट्ट्या शांत होत्या; मात्र टेरव वेतकोंड येथे कोळसा भट्टी लावली जात असल्याची तक्रार एकनाथ माळी यांनी वनाधिकाऱ्यांकडे केली होती. वेतकोंड येथील शांताराम तुकाराम म्हालीम यांनी वेतकोंड येथेच ४ ते ५ ठिकाणी बेकायदेशीर जंगलतोड करून कोळसा भट्टीचा अनधिकृत व्यवसाय थाटल्याचे म्हटले होते.