
ओरोसमध्ये विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून बंधारा
66227
ओरोस ः देऊळवाडी येथे विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बंधारा उभारला.
विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ओरोसमध्ये बंधारा
‘उद्यानविद्या’चा उपक्रम; ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चा संदेश
सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. ३ : मुळदे (ता. कुडाळ) येथील उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ओरोस-देऊळवाडी येथे बंधारा बांधून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चा संदेश दिला.
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंसेवक, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच ओरोस येथील ग्रामस्थांच्या श्रमदानातून नुकताच कोकण विजय बंधारा बांधण्यात आला. उद्यानविद्याचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डॉ. संदीप गुरव, डॉ. गिरीश उईके, प्रा. हर्षवर्धन वाघ, प्रा. महेश शेडगे, कर्मचारी वर्गातून ज्ञानेश्वर सावंत, तुकाराम खरात, राजू पावसकर, अविनाश नाईक व नंदकिशोर पालव या सर्वांनी बंधारा बांधण्याच्या कामात विद्यार्थ्यांसोबत सक्रिय सहभाग घेतला. या प्रसंगी ओरोस गावातील उद्योजक रवींद्र परब, ग्रामपंचायत सदस्य नागेश ओरोसकर, प्रगतशील शेतकरी त्रिभुवने यांनी भेट देऊन सहकार्य केले. बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. अडविलेल्या पाण्याचा वापर परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला पिकवण्यासाठी करता येणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी राजस कदम याने सर्व उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंसेवक, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे आभार मानले.