
आसोली-जोसोली जत्रोत्सव उत्साहात
आसोली-जोसोली जत्रोत्सव उत्साहात
वेंगुर्ले ः आसोली-जोसोली येथील जागृत देवस्थान श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव थाटात साजरा झाला. यानिमित्ताने सकाळी धार्मिक विधी, सकाळपासून देवाला केळी ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम पार पडले. जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री टाळ मृदुंगाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत श्रींची पालखी प्रदक्षिणा झाली. त्यानंतर रात्री मामा मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळाचे दशावतारी नाटक झाले.
----------------
तरंदळेत ५१ जणांचे रक्तदान
कणकवली ः श्री वशिक मर्यादा जागृत देवस्थान ट्रस्टच्यावतीने तरंदळे-खोतवाडी येथे काल (ता. ३) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे २ दुर्मिळ रक्त गटाच्या दात्यांनी व २ महिला दात्यांनी रक्तदान केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मंदिर ट्रस्टने या पद्धतीचा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच भविष्यातही या प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
--
पेंडूरला २७ पासून त्रैवार्षिक ‘मांड’
मालवण ः मालवण तालुक्यातील पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिरातील त्रैवार्षिक मांड उत्सव ३० डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होणार आहे. १४ दिवस चालणाऱ्या या मांड उत्सवाचा भाविक, भक्तांनी तसेच मुंबईस्थित ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.