
फणसू, पांगारी रस्त्यावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजवले
फणसू, पांगारी रस्त्यावरील
खड्डे ग्रामस्थांनी बुजवले
दाभोळः दापोली तालुक्यातील फणसू ते शिरवणे कोंडवाडी, दवंडेवाडी, गावदेवी मंदिर, घाणेकरवाडी तसेच विरशेत मुख्य पांगारी रस्ता या दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवत वाढलेली झाडी शिरवणे दवंडेवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने श्रमदान करत साफसफाई करून तोडून सामाजिक बांधिलकी जपली आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढते. त्याचप्रमाणे रस्त्याची धूप होऊन खड्डेही पडतात. प्रत्येकवेळी शासनाच्या मदतीची किती अपेक्षा करायची. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, हा प्रामाणिक हेतू ठेवून हे श्रमदान आम्ही नेहमी करत असतो, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या उपक्रमात सरपंच सागर रेमजे, काशीनाथ मळेकर, श्रीकांत दवंडे, अशोक दवंडे, रामचंद्र मळेकर, दिनेश दवंडे, इटू मास्टर उपस्थित होते.
----------------
दापोलीत शालेय क्रीडा
स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
दाभोळः दापोली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरवात झाली. बुद्धिबळ स्पर्धेत सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूलने आपले वर्चस्व राखले. १४ वर्षाखालील (मुलगे) विजयी संघात श्रीवल्लभ गोविलकर चतुर्थ व अर्पण साळवे पाचवा क्रमांक तर मुलींमध्ये निधी मालुने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील (मुलगे) अनुक्रमे ओम होन, सोहम चोगले, अर्जुन जाधव तर सिद्धांत तिरपुडे पाचवा तर मुलींमधून आयशा कोवळे प्रथम, अनन्या चौहानने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. १९ वर्षाखालील (मुलगे) मैत्रेय जाधव प्रथम, अनुज बोहरा तृतीय, मिहिर पांगत चतुर्थ तर मुलींमधून हर्षाली मालूने प्रथम क्रमांक प्राप्त करून आपल्या शाळेचे नाव उंचावले. या सर्व विजयी संघांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.
-----------------------
१० उमेदवारी अर्ज
सरपंचपदासाठी दाखल
दाभोळः दापोली तालुक्यातील आदर्श व स्वच्छ गाव असलेल्या जालगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी तब्बल १० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून १५ सदस्यांसाठी ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सरपंचपदासाठी अक्षय फाटक, मनोज भांबीड, श्रीराम इदाते, विकास लिंगावळे, रवींद्र गुरव, विलास जालगावकर, जयंत पालकर, सुरेश मिसाळ, विजय धोपट, मिलिंद शेठ तर सदस्य पदासाठी प्रभाग क्र. १ मधून मृणाल लिंगावळे, दिनेश बटावळे, यागेश साटम, रूपाली मोरे. प्रभाग २ मधून हर्षली तांबे, स्वप्नील भाटकरम, संगीता तलाठी, मधुरा तलाठी. प्रभाग क्र. ३ मधून जयदीप पालकर, वैभव कोळंबेकर, रामचंद्र मांडवकर, प्रतिभा दांडेकर, गौरी पेंडसे. प्रभाग क्र. ४ मधून मयूर मोहिते, साक्षी कदम, रिया घाग, राजेंद्र चोरगे, सुवर्ण चोरगे. प्रभाग क्र. ५ मधून रवींद्र गुरव, शर्वरी धोपट, राजेंद्र चव्हाण, सायली आठल्ये, मनस्वी धाडवे, मंगेश भैरमकर, मृणाली पाथे, स्वप्नील पाथे, योगेश पालकर. प्रभाग क्र. ६ मधून प्रसाद फाटक, समृद्धी जाधव, अमित आलम, उमेश पाटेकर, रवींद्र गुरव, विकास लिंगावळे या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
-----------------------