
सलग दुसऱ्या दिवशी वाघाकडून म्हशीचा फडशा
सलग दुसऱ्या दिवशी
वाघाकडून म्हशीचा फडशा
भेकुर्लीवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण
साटेली भेडशी, ता. ३ : भेकुर्ली येथे पाठोपाठ दुसऱ्या दिवशी भर दुपारी तेथील नाना मया पाटील यांच्या दुभत्या म्हशीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. हल्ला करणारा वाघच आहे. नर-मादी मिळून पाळीव जनावरांवर गावकऱ्यांच्या समक्ष भरदिवसा हल्ला करत असल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे. वाघाने काल (ता. २) भैरू गंगाराम झोरे यांच्या म्हशीचा फडशा पाडला होता. तर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पाटील यांच्या म्हशीचा फडशा पाडला. तिच्यावर मागून हल्ला करून फडशा पाडला आहे.
गेल्या काही दिवसांत सातत्याने अशा घटना घडूनही वन विभाग मात्र सुशेगाद असल्याने संताप व्यक्त होत आहे. भैरू झोरे आणि नाना पाटील यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
भेकुर्लीतील ग्रामस्थांच्या पाळीव जनावरांवर वाघाचे हल्ले चढविणे नित्याचेच झाले आहे. तेथील भैरू झोरे यांच्या कुत्र्यासह म्हशी, गायींवर वाघाने अनेकवेळा हल्ला करून त्यांच्या फडशा पाडला आहे. काल देखील त्यांच्या एका म्हशीचा वाघाने फडशा पाडला होता. तत्पूर्वी काल सकाळी सोडलेल्या म्हशी आणण्यासाठी भैरू झोरे माळरानावर गेले होते. यावेळी त्यांच्या जनावरात एक म्हैस नसल्याचे त्यांना दिसून आले. म्हणून त्यांनी त्या म्हशीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना वाघाने फडशा पाडलेली त्यांची म्हैस आढळली. भैरू झोरे यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाना पाटील यांच्या म्हशीवर आज दुपारी दोनच्या दरम्यान हल्ला झाला. त्या परिसरात इतर पाळीव जनावरांचेही अवशेष आढळले. त्यात जनावरांची फक्त हाडे शिल्लक आहेत. सर्व जनावरांवर वाघच हल्ला करत असल्याचे ग्रामस्थांनी प्रत्यक्षात पहिले आहे. त्या परिसरात वाघाचा वाढता वावर पाहता पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी अनेकवेळा वन विभागाकडे केली आहे. लोकप्रतिनिधी आणि वन विभागाने मात्र त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
..................
कोट
वाघाच्या हल्ल्यात पाळीव व अन्य जनावरे संपल्याने आता वाघाकडून मानवावर हल्ला होण्याची भीती आहे. वन विभागाने डोळ्यावरची झापडे काढून तेथे उच्छाद मांडलेल्या वाघ-वाघिणीला जेरबंद करावे. याबाबत खासदार विनायक राऊत यांचेही लक्ष वेधले आहे.
- बाबूराव धुरी, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट