
ठाकरे गटाची चौघांवर जबाबदारी
66346
कोलगाव ः येथे बैठकीस उपस्थित खासदार विनायक राऊत व पदाधिकारी.
ठाकरे गटाची चौघांवर जबाबदारी
सावंतवाडीतील स्थिती; कोलगावातील बैठकीत खासदार विनायक राऊत यांचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चौघा शिलेदारांवर दिली आहे. यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार आणि सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा समावेश आहे. खासदार राऊत यांच्या उपस्थितीत कोलगाव येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व निर्माण करण्याकरिता मतदारसंघ पिंजून काढा. निर्णय चांगला येईल. या दृष्टीने परिश्रम घ्या, असे आवाहन खासदार राऊत यांनी यावेळी केले. सावंतवाडी तालुक्यातील सर्व ५२ ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण करा. आपला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य या ग्रामपंचायतींवर विजयी होतील, या दृष्टीने प्रचार यंत्रणा राबवा. जास्तीत जास्त जागांवर विजय संपादन करा. यासाठी विक्रांत सावंत, बाळा गावडे, कासार आणि रुपेश राऊळ यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पडते आणि अतुल रावराणे यांचीही मदत घेऊन प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने परिश्रमपूर्व काम करा आणि ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करा, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले. यावेळी संजय पडते, नागेंद्र परब, अतुल रावराणे, विक्रांत सावंत, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, बाळा गावडे, रुची राऊत, रुपेश राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, आबा सावंत, नामदेव नाईक, युवा सेना तालुकाधिकारी योगेश नाईक, गुणाजी गावडे, माजगाव माजी उपसरपंच संजय कानसे, संदीप माळकर, राजू शेटकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोलगाव येथे मायकल डिसोजा यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.
.................
चौकट
जिल्हाधिकाऱ्यांचे ‘लम्पी’कडे वेधले लक्ष
तालुक्यातील आंबेगाव येथे तब्बल १५ जनावरे लम्पी बाधित असून याकडे खासदार राऊत यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे लक्ष वेधून तत्काळ परिस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश दिले. या १५ जनावरांपैकी आठ ते दहा बैल, तर अन्य गाई आहेत. लम्पीने एका जनावराचा मृत्यू झाला आहे. ही बाब शिवसेनेचे आंबेगाव येथील कार्यकर्ते नामदेव नाईक यांनी खासदार राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी जातीने लक्ष घालून साथ रोखण्याचे काम करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.