
राजन साळवी
आमदार राजन साळवी
यांना ‘ईडी’ची नोटीस
राजापूर, ता. ३ ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे राजापूरचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक (ईडी) विभागाने मालमत्ते संदर्भात नोटीस पाठवली आहे. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मालमत्तेच्या चौकशीसंदर्भात नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. येत्या ५ डिसेंबर रोजी मालमत्ता चौकशीसाठी सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे बोलले जात आहे. कोकणातून शिवसेनेच्या नऊ आमदारांपैकी केवळ ३ आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. बाकी सर्व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांमध्ये आमदार श्री. साळवी यांचा समावेश आहे. यापूर्वी कोकणातील आमदार वैभव नाईक यांना नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यानंतर आता श्री. साळवी यांना नोटीस बजावण्यात आली असून, ते आता चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.