
पावस-क्राईम
पेट्रोलपंपावर चोरीप्रकरणी
न्यायालयीन कोठडी
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील नायरा पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी एका परदेशी व्यक्तीला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली होती. त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायायाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
१३ डिसेंबर २०२१ ला नायरा पेट्रोल पंप येथील कर्मचाऱ्यांकडून २२ हजार ५०० रुपये अज्ञात वाहन चालकाने लंपास केली होती. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३१ नोव्हेंबर २०२२ ला वर्धा येथील हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या वतीने टीप मिळाल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी इराण येथील परदेशी व्यक्ती दिल्ली येथे सध्या वास्तव्यात असलेल्या मोहम्मद अली गुलाब हुसेन उर्फ हुसेन अब्बाशी दालना (वय ४५) हा आपली मोटार घेऊन जात असताना नाकाबंदीमध्ये हिंगणघाट पोलिसांनी अडवल्यानंतर पोलिस बॅरॅकेट उडवून एका पोलिसाला उडवून पळून गेला होता. त्याचा पाठलाग करून गुन्हा अन्वेषण शाखेने त्याला जेरबंद केले. त्यावेळी त्याच्याकडे नऊ लाख ३४ हजार रोख, मोबाईल, परकीय चलन सापडले होते. चौकशीअंती त्याने रत्नागिरी तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर चोरी केल्याचे कबूल केले होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ललित देऊस्कर, श्री. सावंत आदींसह चार जणांचे तपासणी पथक हिंगणघाट पोलिस ठाण्यात दाखल झाले. तिथे संशयिताला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती.
तीन दिवसानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
--------
गोळपला अपघातात दोघे जखमी
पावस ः रत्नागिरी-पावस मार्गावरील गोळप पूल येथे दुचाकी व मोटारीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीरित्या जखमी झाले असून अज्ञात चारचाकी वाहनचालकावर पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ डिसेंबरला दुपारी दोनच्या सुमारास गोळप मोहल्ला येथील फकीर महंमद लतीफ पांढरे (वय ६९) हे दुचाकीवर (एमएच-०८-एएम-७३९२) मित्र सत्तारमियॉं पावस्कर यांना पाठीमागे बसून फिनोलेक्स पाटा ते गोळप मोहल्ला येते घरी जात होते. त्यावेळी गोळप पूल येथे पावसकडून रत्नागिरीकडे जाणारी मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये फकीर महंमद पांढरे यांच्या डाव्या कानाला, हाताला, दोन्ही पायांना दुखापत झाली. तसेच सत्तारमियॉं पावसकर यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि डाव्या पायाला दुखापत झाली. याप्रकरणी अज्ञात मोटारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.