सावंतवाडी तालुक्यात रणधुमाळी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी तालुक्यात रणधुमाळी सुरू
सावंतवाडी तालुक्यात रणधुमाळी सुरू

सावंतवाडी तालुक्यात रणधुमाळी सुरू

sakal_logo
By

रणधुमाळी लोगो
........................

सावंतवाडी तालुक्यात रणधुमाळी सुरू
ग्रामपंचायत निवडणूकः महाविकास विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना, भाजपमध्ये लढत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः तालुक्यात ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक १८ डिसेंबरला होत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षाचे सरपंच व सदस्यपदाचे उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना व भाजप अशी लढत होणार आहे. दोघांमध्ये युती असली तरी बाळासाहेबांची शिवसेनेचे किती सरपंच व सदस्य बसतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बुधवारी (ता.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गावागावातील चित्र स्पष्ट होणार आहे.
तालुक्यामध्ये बहुसंख्य ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता आहे. आता बाळासाहेबांची शिवसेना सोबत असल्याने भाजपची ताकद अधिक वाढली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी या धर्माने उद्धव शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरे जात आहेत. आताच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाकडून बऱ्याच ग्रामपंचायतीवर पॅनल उभे केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे-परब या नेतृत्व करत आहेत तर दुसरीकडे उद्धव शिवसेनेकडून रुपेश राऊळ, विक्रांत सावंत आणि बाळा गावडे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपकडून सगळेच पदाधिकारी दिलेल्या गावांमध्ये काम पाहत आहेत. एकूणच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे लक्ष ठेवून आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची पकड तालुक्यावर असली तरी आत्ताच्या निवडणुकीमध्ये उद्धव शिवसेनेची ताकद टाळून चालणार नाही. गावा गावामध्ये उद्धव शिवसेनेचे पॅनल स्वतंत्र उभे राहिले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुरंगी लढत तर काही ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावपातळीवरील समीकरणे लक्षात घेता बऱ्याच ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध भाजप अशी ही लढत पाहायला मिळत आहे. एकीकडे दोघांची युती झाली असली तरी गावातील संघर्ष पाहता दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. काही ठिकाणी भाजप उद्धव शिवसेना एकत्र आली आहे, तर काही ठिकाणी उद्धव शिवसेना व बाळासाहेबांची शिवसेना अशीही लढत पाहायला मिळत आहे.

चौकट
पक्षांमध्ये अंतर्गत वाद
थेट सरपंच पदामुळे ओपन आरक्षण पडलेल्या गावात पक्षा पक्षांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत. इच्छुकांची संख्या वाढल्याने हा पेच निर्माण झाला आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या दिवशी कोण उमेदवारी मागे घेतो? कोणा-कोणामध्ये युती व राजकीय समीकरणे जुळतात? यातून गावागावातील चित्र स्पष्ट होणार आहेत. सध्या तरी भाजप बाळासाहेबांची शिवसेना यांची ताकद या ठिकाणी दिसून येत आहे. उद्धव शिवसेनेने ही आपली ताकद दाखवण्यासाठी कंबर कसली आहे. तालुक्यात काही ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी विरोध झाला आहे. त्या ठिकाणी फक्त सदस्य पदासाठी निवडणुका होत आहेत.