चिपळूण-सात कोटींच्या खर्चानंतर केंद्राचे कुलूप उघडेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-सात कोटींच्या खर्चानंतर केंद्राचे कुलूप उघडेना
चिपळूण-सात कोटींच्या खर्चानंतर केंद्राचे कुलूप उघडेना

चिपळूण-सात कोटींच्या खर्चानंतर केंद्राचे कुलूप उघडेना

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat५p४.jpg ः KOP२२L६६६०४ चिपळूण ः दुरुस्तीच्या गर्तेत अडकलेले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र.
---------------
सात कोटींच्या खर्चानंतर केंद्राचे कुलूप उघडेना

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ; नूतनीकरणाची कामे संपतच नाहीत

चिपळूण, ता. ५ ः समस्त चिपळूणवासीयांची अस्मिता ठरलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासाठी अद्यापही निविदावर निविदांची घोषणाबाजी सुरू आहे. आताही पालकमंत्र्यांनी ३ कोटीचा निधी जाहीर केला आहे; परंतु प्रशासकीय जोखंडात अडकलेल्या या सांस्कृतिक केंद्राचा पडदा उघडण्यासाठी मुहूर्त सापडेना, अशी परिस्थिती आहे. अद्यापपर्यंत तब्बल ७ कोटीहून अधिक निधी खर्च होऊन देखील केंद्र कुलूप बंद असल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्रत्यक्षात २०१६ ला केंद्र नुतनीकरणाचे काम सुरू झाले. त्या वेळी फक्त ३ कोटी निधी उपलब्ध होता. कामाला सुरवात झाल्यानंतर सांस्कृतिक केंद्र हे अत्याधुनिक तसेच सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कामात अनेक बदल सुचवतानाच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचीदेखील आवश्यकता भासू लागली. साहजिकच कामे वाढली. त्यामुळे खर्चदेखील वाढत गेला. कामाचे सर्वाधिकार प्रशासन व आर्किटेक्टला सभागृहाने दिल्याने निविदावर निविदा निघू लागल्या आणि तब्बल ७ कोटी खर्चापर्यंत नूतनीकरणाचे काम पोहचले. काम अंतिम टप्प्यात आले असताना खुर्ची खरेदीत घोळ झाल्याचा आरोप झाला आणि संपूर्ण कामाबाबतच शंका उपस्थित झाली. पुढे कामाची चौकशी तसेच आर्किटेक्ट नसणे, नगरपालिका बांधकाम विभागाच्या अखत्यारित झालेली पुढील कामे, उर्वरित कामासाठी निधी आणि मान्यता अशा अनेक प्रशासकीय जोखंडात सांस्कृतिक केंद्र रखडून पडले. तत्कालीन पाकलमंत्री अनिल परब तसेच सरकारमधील कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी वेळोवेळी या संदर्भात काही घोषणा तर काही आदेश दिले आणि नाट्यप्रेमींना त्या वेळी आश्वासनेदेखील दिली; परंतु पुढे काहीच घडले नाही.
पुढे २०२१ ला आलेल्या महापुरात नूतनीकरण केलेले केंद्र पूर्णतः पाण्याखाली गेले. त्यामुळे केंद्राचा विषयच जणू वीस्मरणात गेला. आतापर्यंत या कामासाठी तब्बल ९ निविदा काढण्यात आले आहेत, तर ७ कोटीहून अधिक निधी खर्च झाला आहे. आता पुन्हा २ कोटी ८४ लाख रुपयांची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सुरू करण्याबाबत एकमत झाले; परंतु प्रशासकीय अडचणी सोडवणार कोण आणि कशा? यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती राहिली.
------
चौकट
अगोदर कामे मग निविदेच्या तक्रारी

आता पालकमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा या विषयाला चालना देण्याची घोषणा केली आहे. ३ कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच उर्वरित कामांसाठी निविदा काढण्याच्या सूचनादेखील त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत; परंतु ज्या कामांच्या निविदा काढायच्या आहेत, ती कामे अगोदरच झाली असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल आहेत. त्यामुळे नवीन निविदा काढताना प्रशासनासमोर अडचणी आहेत. तसेच त्या कामांच्या प्रशासकीय मंजुरीचा गुंतादेखील कायम आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी निधीची घोषणा केली असली तरी पुढील अडचणी पाहता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा पडदा उघडणार कधी? याबाबत सध्या तरी साशंकताच वर्तवली जात आहे.