
चिपळूण-लेखा विभागात 4 कोटी 8 लाखाचा अपहार
पान १ साठी
चिपळूणमध्ये ‘बांधकाम’च्या
लेखा विभागात ४.८ कोटींचा अपहार
अनामतची परस्पर विल्हेवाट; महिलेसह सात जणांना अटक
चिपळूण, ता. ५ : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागातील दोघांनी ४ कोटी ८ लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ठेकेदारांनी ठेवलेली अनामत परस्पर ऑनलाईन पद्धतीने बनावट ठेकेदारांच्या नावाने वळवली आहे. याप्रकरणी महिलेसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारे यांनी दिली.
याप्रकरणी जीवन मारुती खंडजोडे (४८, रा. मार्कंडी), प्रतीक प्रमोद भिंगार्डे (३०, वालोपे), रजनीश राजेंद्र टाकळे (३१, वालोपे), संदीप सुरेश आंबुर्ले (३५ पेठमाप), प्रवीण दिलीप भिसे (३६, काविळतळी), परेश प्रमोद भिंगार्डे (३०, वालोपे, सध्या पिंपरी चिंचवड) व एका महिलेस अटक केली आहे. याची फिर्याद चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरजित रामसे यांनी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा विभागातील व्यवहारात काहीशी अनियमितता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे याविषयी त्यांनी पोलिसांची मदत घेतली. गेले काही दिवस पोलिसांमार्फत याची चौकशी सुरू होती. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेले जीवन मारुती खंडझोडे व प्रतीक प्रमोद भिंगार्डे यांनी काही मित्र व नातेवाइकांच्या बॅंक खात्यात ऑनलाईन रक्कम वर्ग केली. त्यानंतर पुन्हा एक-दोन दिवसांतच या दोघांनीही ती रक्कम स्वतःच्या बॅंक खात्यात वळवली. तब्बल दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. याविषयी खात्री पटताच पोलिसांनी संबंधितांना अटक केली. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का, यादृष्टीने तपास सुरू आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी व पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी मोठ्या शिताफीने हा प्रकार उघडकीस आणला. तितक्याच तातडीने त्यांनी संशयितांच्या मुसक्याही आवळल्या आहेत.
अनामतवरच डल्ला
सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूणच्या माध्यमातून कोट्यवधीची विकासकामे केली जातात. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकामच्या कामापोटी याच कार्यालातून देयके आदा केली जातात. विकासकामांच्या देयकातून सुरक्षा अनामत ठेवली जाते. सलग काम करणारे ठेकेदार ही रक्कम काढत नसल्याने ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच शिल्लक राहते. त्याचा फायदा उठवत दोघांनी मित्र व नातेवाइकांच्या मदतीने अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
बनावट ठेकेदारांची नोंद
सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक नोंदणीकृत ठेकेदार कार्यरत आहेत. यातील काही ठेकेदार वर्षानुवर्षे काम करीत आहेत; मात्र या ठेकेदारांमध्ये काही बनावट ठेकेदारांची नोंदणी केली. त्यामुळेच हा प्रकार घडला. सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदार नोंदणीबाबतही शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. शिवाय या कार्यालयाच्या लेखा तपासणीवर बोट ठेवले जात आहे.