शिशुमका (बेबी कॉर्न) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिशुमका (बेबी कॉर्न)
शिशुमका (बेबी कॉर्न)

शिशुमका (बेबी कॉर्न)

sakal_logo
By

67078
डॉ. विलास सावंत
--
67118
बेबी कॉर्न
---


शिशुमका (बेबी कॉर्न)

शिशुमक्याला ‘बेबी कॉर्न’, असे म्हणतात. शिशुमका म्हणजे मक्याच्या लहान आकाराचे वाण. याचे कणीस चवदार व पौष्टिक असते. शिशुमक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, प्रथिने व जीवनसत्त्वे असतात. या मक्याची कणसे कच्ची किंवा शिजवून खाल्ली जातात. या पिकाला मध्यम ते भारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी उत्तम निचऱ्याची जमीन मानवते.
- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस
...............
एक खोल नांगरट करून फळी मारून जमीन भुसभुशीत व सपाट करून घ्यावी. पाणी देण्यासाठी योग्य आकाराचे वाफे व पाट करावेत. रब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात पेरणी करावी. या पिकाची उशिरा किंवा लवकर पेरणी केल्यास उत्पन्नावर विशेष परिणाम होत नाही. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिशुमक्याच्या ‘जी-५४०६’, ‘माधुरी’, ‘मांजरी’ या जाती कोकणासाठी शिफारस केल्या आहेत. या जातींचा कालावधी ७० ते ८५ दिवस असून उत्पादकता १५ ते २० क्विंटल प्रति हेक्टर आहे. पेरणी ४५ सें.मी. X २० सें.मी. अंतरावर करण्यासाठी हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी एका किलो बियाण्यास ३ ग्रॅम याप्रमाणे ‘थायरम’ हे बुरशीनाशक लावावे. जमिनीची मशागत करताना हेक्टरी १० टन सेंद्रिय खत द्यावे व ते मातीत शेवटच्या कुळवाच्या पाळीने चांगले मिसळून घ्यावे. या पिकाला हेक्टरी अनुक्रमे १००: ५०: ५० अशी नत्र, स्फुरद व पालाशची मात्रा द्यावी. यापैकी ४० किलो नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीपूर्वी द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्राची मात्रा पिकाला ओळीशेजारी लहान सरी काढून मातीने बुजवून द्यावी. या पिकाला १० ते १२ दिवसांच्या अंतराने ६ ते ७ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आवश्यकतेनुसार पेरणीनंतर १० दिवसांनी नांगे भरून घ्यावे. पेरणीनंतर २० दिवसांनी कोळपणी आणि ४० दिवसांनंतर पुन्हा एक बेणणी करावी. या पिकात दाणे भरू नयेत म्हणून परागीकरण टाळण्यासाठी मक्याचे तुरे येताच लगेच कणसे काढावीत. कणसातील अळी, लष्करी अळी तसेच मावा या किडींच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस १.५ टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी. पानावरील करपा आणि तांबेरा या रोगांचा उपद्रव आढळल्यास नियंत्रणासाठी डायथेन एम-४५ हे औषध ३ ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारावे. पेरणीनंतर साधारण ७० दिवसांनी कणसावरील रेशमी तंतू बाहेर डोकावू लागल्यानंतर कणसांची काढणी करावी. कणसांची काढणी रेशमी तंतू मुलायम असताना व ते सुकण्यापूर्वीच करावी, म्हणजे उत्तम प्रतीचे बेबीकॉर्न मिळतात. कणसांची काढणी झाल्यानंतर मक्याची हिरवी ताटे दुभत्या गुरांना चारा म्हणून अत्यंत उपयोगी आहेत.