
कोकणात मार्गदर्शन केंद्राची गरज
67083
कळसुली ः येथे स्पर्धा परीक्षांबाबत सत्यवान रेडकर यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र : एन. पावसकर)
कोकणात मार्गदर्शन केंद्राची गरज
सत्यवान रेडकर; कळसुलीत स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन
तळेरे, ता. ७ : कोकणातील प्रत्येक गाव शासकीय कर्मचाऱ्यांचा गाव व्हावा. यासाठी कोकणात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु होऊन येथील विद्यार्थ्यांना यशाचे द्वार खुले व्हावे, असे प्रतिपादन ‘तिमिरातून तेजाकडे’चे संस्थापक, स्पर्धा परीक्षा व्याख्याते, मुंबई सीमाशुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी केले.
कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेच्या सभागृहात आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कार्याध्यक्ष सूर्यकांत दळवी, खजिनदार जय दळवी, स्कूल कमिटी चेअरमन के. आर. दळवी, उपाध्यक्ष नामदेव घाडीगावकर, रजनीकांत सावंत, दयानंद सावंत, संदीप सावंत आदी उपस्थित होते. रेडकर व दयानंद सावंत यांचा सूर्यकांत दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रेडकर यांचे हे १३४ वे निःशुल्क व्याख्यान होते. स्पर्धा परीक्षेचे विविध पैलू, सामान्य ज्ञान मिळविण्याच्या विविध पद्धती, विविध नोकरी-व्यवसायाच्या संधी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ‘मन की बात’ या सदराखाली १५० पेक्षा जास्त विद्यार्थांनी त्यांना पत्रे लिहिली. दळवी यांनीही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचे कानमंत्र दिले. प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे यांनी कार्यक्रमास शुभेछा दिल्या. यावेळी शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष शिवाजी गुरव, माजी वरिष्ठ लिपिक चंद्रसेन गोसावी, रणजित सुतार, हेमंतकुमार परब, नारायण दळवी, श्वेता दळवी, सुकन्या कदम, नीता गुरव आदी उपस्थित होते. सी. जी. चव्हाण यांनी आभार मानले.