‘समता प्रेरणाभूमी’ सावंतवाडीची ओळख व्हावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘समता प्रेरणाभूमी’ सावंतवाडीची ओळख व्हावी
‘समता प्रेरणाभूमी’ सावंतवाडीची ओळख व्हावी

‘समता प्रेरणाभूमी’ सावंतवाडीची ओळख व्हावी

sakal_logo
By

67085
सावंतवाडी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर. बाजूला अॅड. संतोष सावंत, विठ्ठल कदम, प्रा. रुपेश पाटील, अभिमन्यू लोंढे आदी.

‘समता प्रेरणाभूमी’ सावंतवाडीची ओळख व्हावी

बबन साळगावकर ः कोमसाप शाखेतर्फे महापरिनिर्वाण दिन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः संस्थानकालीन सावंतवाडीला १९३२ मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला. त्यांच्या पदस्पर्शाने चैतन्यमय झालेल्या या भूमीची समता प्रेरणाभूमी म्हणून राज्यात ओळख निर्माण व्हावी, यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित साहित्य खंड शासनाने प्रकाशित करावेत, अशी मागणी साहित्यप्रेमींकडून केली जात असून या साहित्य चळवळीचा सावंतवाडीच्या क्रांतिभूमीतून उगम व्हावा, असे मत साहित्यप्रेमी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.
येथील समता प्रेरणाभूमी येथे काल (ता. ६) कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला साळगावकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी कोमसापचे जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, सावंतवाडी अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, जिल्हा सदस्य प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. रुपेश पाटील, ज्येष्ठ कवी साहित्यिक प्रकाश तेंडुलकर, कवी दीपक पटेकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, कवयित्री स्नेहा कदम, ममता जाधव, भावना कदम, ‘सामाजिक बांधिलकी’चे रवी जाधव, एकनाथ कांबळे, अनंत कदम, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, आनंद धोंड, शैलेश मयेकर, निखिल माळकर, शुभम धुरी, सिद्धेश पुरलकर आदी उपस्थित होते.
प्रा. पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या साहित्याचा आढावा घेत त्यांचे साहित्य जागतिक स्तरावर जगाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या साहित्यावर जगामधून संशोधन होत आहे. डॉ. आंबेडकर यांनी मानवाला जगण्याची प्रेरणा आणि समतेचा विचार दिला, असे सांगितले. अॅड. सावंत यांनी सावंतवाडीतील सर्व साहित्यप्रेमींनी तसेच संस्थांनी समतेचा नवा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी हातात हात घेऊन एकोप्याने डॉ. आंबेडकरांची साहित्य चळवळ पुढे नेऊया. सावंतवाडीच्या चैतन्य भूमीला समता प्रेरणाभूमी म्हणून ओळख देण्यासाठी सर्वांनी एक होऊया, असे आवाहन केले. प्रा. गोवेकर यांनी डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या लढ्यामुळेच खऱ्या अर्थाने कामगारांना न्याय मिळाला, असे स्पष्ट केले. कवी विठ्ठल कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश तेंडुलकर यांनी आभार मानले.
--
नामकरणासाठी प्रयत्नशील
साळगावकर म्हणाले की, ‘‘सावंतवाडीच्या या भूमीचे ‘समता प्रेरणाभूमी’ म्हणून नामकरण व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्याला माझा पाठिंबा असून निश्चितपणे यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी पुढाकार घेईन. शासनाने डॉ. आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करावे आणि ही चळवळ जिल्ह्यातील साहित्यिकांनी पुढे न्यावी.’’