
ज्ञानसूर्याच्या विचारांचे वारसदार होऊया
67122
कुडाळ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहताना प्राध्यापक वर्गासह बी.एड्, नर्सिंगच्या विद्यार्थिनी- विद्यार्थी. (छायाचित्र ः अजय सावंत)
ज्ञानसूर्याच्या विचारांचे वारसदार होऊया
प्रा. अरुण मर्गज ः कुडाळमध्ये डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
कुडाळ, ता. ७ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ज्ञानसूर्याच्या विचारांचे वारसदार होऊया. हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. त्यांनी सांगितलेली प्रज्ञा, शील, करुणा ही त्रिसूत्री आत्मसात करुया, असे प्रतिपादन प्रा. अरुण मर्गज यांनी केले. येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रा. मर्गज, "बाबासाहेब हे चालते बोलते ज्ञानपीठ होते. आयुष्यभर ज्ञानसाधना करत आपल्यातील विद्यार्थित्व जपले आणि जगात सर्वोत्तम अशी भारतीय राज्यघटना निर्माण केली. ''शिका व संघटित व्हा'' हा मंत्र देऊन गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिव्य संदेश पददलितांना दिला. कारण त्यांचा विकासच खऱ्या अर्थाने राष्ट्राचा विकास ठरतो. म्हणून दलितांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या न्याय हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. एवढेच नव्हे, तर राज्यघटनेमध्ये बहुजन समाजाला विकासाच्या गंगेत आणण्यासाठी भरीव तरतूद करत सत्य, न्याय, समता व बंधूता याचा जगभरात संदेश दिला. त्यांचे जीवन आजच्या पिढीसाठीच नव्हे, तर येणाऱ्या पिढ्यांसाठीही आदर्शवत आहे. त्यांचे जीवन चरित्र, शैक्षणिक विचार, सामाजिक चिंतन आणि प्रभावी भाषणे ऐकली तर आपण का जगले पाहिजे? कोणासाठी जगले पाहिजे? या प्रश्नांची आपोआप उत्तरे मिळतात. म्हणून भारताला लाभलेल्या या मौल्यवान कोहिनूर हिऱ्याचे विचार कृतीयुक्त सुवर्ण कोंदणात सजवून अंगीकारूया." यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा उपस्थितांना परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर महिला बी.एड् कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, प्रा. कल्पना भंडारी, प्रा. सुमन करंगळे- सावंत, प्रसाद कानडे, प्रा. प्रणाली मयेकर, प्रा. वैजयंती नर, प्रा. प्रांजना पारकर, प्रा. पूजा म्हालटकर आदी उपस्थित होते.