३६ लाखाच्या सौर कुंपणाचे ‘तीनतेरा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३६ लाखाच्या सौर कुंपणाचे ‘तीनतेरा’
३६ लाखाच्या सौर कुंपणाचे ‘तीनतेरा’

३६ लाखाच्या सौर कुंपणाचे ‘तीनतेरा’

sakal_logo
By

67123
मळगाव ः घाटी परिसरात वनविभागाकडून उभारण्यात आलेले सौर कुंपण देखभालीविना झाडींनी व्यापले आहे.


३६ लाखाच्या सौर कुंपणाचे ‘तीनतेरा’

वन्यप्राण्यांपासून संरक्षण; देखभालीअभावी खर्च गेला पाण्यात

रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः जंगली प्राण्यांकडून शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी वनविभागाकडून पाच वर्षांपूर्वी तब्बल ३६ लाख रुपये खर्चून मळगाव-कुंभार्ली परिसरातील वन हद्दीत उभारण्यात आलेले सौर कुंपण कुचकामी ठरले आहे. देखभाल दुरुस्ती अभावी या ठिकाणी हे कुंपण असून नसल्यासारखेच आहे. त्यामुळे या सौर कुंपणाकडे अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यात गेली बरेच वर्ष शेतकऱ्यांची शेती वन्य प्राण्यांकडून भक्ष्य केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने गव्यांचे संकट मोठे आहे. तालुक्यात बऱ्याच गावात हा प्रश्न आज शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. त्यामुळे अशा प्राण्यांना रोखण्यासाठी येथील वनविभागाकडून नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी वन हद्दीत मळगाव-कुंभार्ली परिसरातील शेतीचे संरक्षण व्हावे, याकरिता पाच वर्षापूर्वी सौर कुंपण उभारले होते. वन्यप्राण्यांना सौम्य करंट देऊन त्या मार्गातून परावृत्त करण्यासाठी हा उपाय केला होता. तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यकाळात मळगाव येथील शेतकऱ्यांनी केलेली मागणी लक्षात घेता जिल्हा नियोजनमधून यासाठी ३६ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. तत्कालिन उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या कार्यकाळात २०१७-१८ ला हे काम मार्गी लागले होते. त्यावेळी कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता; मात्र अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात हे काम मार्गी लावले.
तब्बल साडे दहा किलोमीटर परिसरात हे कुंपण उभारण्यात आले. सुरवातीलाच काही प्रमाणात याचा फायदा झाला; मात्र नंतर हे कुंपण कुचकामी ठरले. गेल्या तीन चार वर्षात या कुंपणाच्या देखभाल दुरुस्तीकडे हवा तसा लक्ष दिला गेला नाही. परिणामी कुंभार्ली परिसरात असलेली वन्यप्राण्यांची घुसखोरी आजही कायमच आहे. दिवसाढवळ्या वन्यप्राणी शेतीची नुकसानी करत आहेत. त्यामुळे ३७ लाख खर्च झाले, त्याचा उपयोग काय? असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत.
---
चौकट
योग्य उपाय गरजेचे
मुळात साडेदहा किलोमीटरच्या परिसरात सावंतवाडी शिरोडा मार्ग येत असल्याने याठिकाणी गव्यांना मार्ग खुला होतो. बऱ्याचदा या ठिकाणी रस्त्यावर गवे आडवे आल्याने अपघातही घडले आहे. त्या पद्धतीने या सौर कुंपणाची काळजी देखभाल दुरुस्ती झाली पाहीजे ती होताना दिसत नाही. अधिकारी वर्गाने याकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे कुंपणाच्या तारेवर झाडी वेली वाढणे असे प्रकार घडले आहे. झाडी झुडपांमुळे बऱ्याच ठिकाणी करंटही ब्रेक होतो. यासाठी वनविभागाने योग्य भूमिका घेऊन उपाय आखणे गरजेचे आहे.
-------------
चौकट
कर्मचाऱ्यांची कमतरता
मळगाव परिसरात असलेल्या या सौरकुंपणाची देखभाल दुरुस्तीसाठी मनुष्यबळासोबत आर्थिक बाजू गरजेची आहे. या दोन्हीच्या बाबतीत वनविभाग कमकुवत आहे. सद्यस्थितीत आवश्यक कर्मचारी बळ नसल्याने सौर कुंपण देखभाल दुरुस्तीला अडथळा येत आहे. आवश्यक निधीची तरतूदही नसल्याने हा प्रश्नही पुढे येतो.
-----------
चौकट
बॅटरी चोरीला
मळगाव घाटरस्त्यात असलेल्या कुंपणाच्या हद्दीत बॅटरी युनिटमधील बॅटरीच चोरुन नेली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे; मात्र बॅटरी चोरीमुळे ब्रेक झालेला करंट पुन्हा सुरू करण्यासाठी वनविभागाने काहीच हालचाली केल्या नाहीत.
--
कोट
मळगाव-कुंभार्ली परिसरात उभारलेल्या सौर कुंपणाची देखभाल केली जाते; परंतु आवश्यक कर्मचारी नसल्याने बऱ्याचदा अडचणी येतात. काही ठिकाणी तारेवर झाडी वाढल्याने करंट ब्रेक होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांचा प्रश्न पुन्हा उद्भवतो. प्रामुख्याने जंगलाचे संरक्षण हा महत्त्वाचा भाग असल्याने सगळ्याच गोष्टी साध्य होत नाहीत. या कुंपणाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या शेतीचे संरक्षण होत नाही.
- प्रमोद राणे, वनपाल, मळगाव
--
मोठे पॉईंटर
कामावर एक नजर
- सौरकुंपणावरील खर्च ......३६ लाख रुपये
- काम मार्गी लागलेले साल .......२०१७-१८