
Lumpy skin disease : लम्पी आजाराने चिपळुणातील सहा जनावरांचा बळी
चिपळूण : राज्यात हाहाकार माजवलेल्या लम्पी आजाराने चिपळूण तालुक्यातील सहा जनावरांचा बळी घेतला आहे. कोसबी, फुरूस, अलोरे, आंबेत, वारेली व हडकणी गावातील प्रत्येकी एक पशुधन या आजारामुळे दगावले असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यामुळे येथील पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून लम्पीसदृश जनावरांवर तत्काळ उपचार सुरू केले आहेत. तसेच तालुक्यात ३० हजार ८०६ जनावरांना लम्पीची लसही देण्यात आली असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी बारपात्रे यांनी दिली.
चिपळूण तालुक्यातील काही गावांमध्ये लम्पीसदृश आजाराची जनावरे आढळली होती. त्यांच्या वैद्यकीय तपासणीअंती व नमुन्यांच्या अहवालानुसार, काही जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आतापर्यंत आढळलेली लम्पीसदृश जनावरे व लम्पीच्या जनावरांना येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तत्काळ उपचारास सुरवात करण्यात आली. अधिकाऱ्यांनी या जनावरांना विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या तसेच त्या त्या गावांतील व परिसरातील सर्वेक्षणही करण्यात आले. तालुक्यात लम्पी आजाराची साथ पसरू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष काळजी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर लम्पी लसीकरणावर भर देण्यात आली. शासनाने पाठवलेल्या ३१ हजार ३०० लसींमधून ३० हजार ८०६ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
नुकसान भरपाई मिळणार
लम्पीमुळे दगावलेल्या जनावरांना शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यामध्ये गायीचा मृत्यू झाल्यास ३० हजार रु. तर बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार रु. शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.