
शेतकऱ्यांची पुणे, बारामतीला अभ्यास सहल
शेतकऱ्यांची पुणे, बारामतीला अभ्यास सहल
कृषी विभाग ; ९ ते १३ जानेवारीला प्रशिक्षण दौऱ्याचे नियोजन
रत्नागिरी, ता. ७ ः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी मनुष्यबळ विकास कार्यक्रमातून चिपळूण, गुहागर, संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येकी २० शेतकऱ्यांसाठी पुणे व बारामती येथे प्रत्यक्ष शेतावरील प्रशिक्षण हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत ९ ते १३ जानेवारी २०२३ या कालावधीत प्रशिक्षण दौरा काढला जाईल. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी केले.
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फळबाग, फुले, भाजीपाला लागवड, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, संरक्षित शेतीअंतर्गत ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस, प्लास्टिक इत्यादी घटकांचा लाभ घेतलेले व लाभ घेऊ इच्छित असलेल्या शेतकऱ्यांकडून राज्यांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. महिलावर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते. या कार्यक्रमासाठी प्रत्येक शेतकऱ्याला दररोज एक हजार रुपयेप्रमाणे जास्तीत जास्त पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी शासनामार्फत खर्च करण्यात येईल. यापेक्षा अतिरिक्त खर्च झाल्यास शेतकऱ्यांकडून वाढीव खर्चाची रक्कम आकारण्यात येईल. प्रशिक्षणार्थींची भोजन व निवासव्यवस्था संबंधित उपविभागातील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या समन्वयाने करण्यात येईल.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी प्रदर्शन, कृषी प्रगत शेतकऱ्यांच्या शेतावर तंत्रज्ञान पाहणी व मार्गदर्शन, पॅक हाऊस, कोल्ड स्टोअरेज व निर्यातक्षम भाजीपाला पिकाची पाहणी, गोविंद दूध संघामधील मुक्त गोठा पद्धत पाहणी, विविध चारापिकाची पाहणी व चारा साठवणूक माहिती, निमकर शेळी संशोधन संस्थेस भेट, बंदिस्त शेळीपाळन, विदेशी भाजीपाला व पॉलीहाऊस, स्ट्रॉबेरी लागवड, विविध प्रक्रिया उद्योग, मधुमक्षिका पालन प्रशिक्षण केंद्र इत्यादी पारंपरिक पीक पद्धतीबरोबरच नवीन विकसित तंत्रज्ञानाचीही माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राबरोबरच प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटीचे नियोजन केले आहे.