अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन
अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन

अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन

sakal_logo
By

(फोटो - १०२६८)

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे निवृत्त प्रमुख प्रा. डॉ. जयकुमार फाजगौंडा उर्फ जे. एफ. पाटील (वय ८२) यांचे आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खासगी रुग्णालयात निधन झाले. शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्यांना शनिवारी (ता.३) रुग्णालयात दाखल केले होते. अभ्यासू आणि सामाजिक जाणिवेतून आर्थिक प्रश्नांची मांडणी करणारे अर्थतज्ज्ञ अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या मागे पत्नी कमल पाटील, मुलगा अभिनंनदन, मुलगी राजलक्ष्मी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा उद्या (ता.८) सकाळी आठ वाजता निघणार असून त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. जे. एफ. पाटील यांच्या जन्म १ एप्रिल १९४२ साली सांगली जिल्ह्यातील समडोळी गावी झाला. अर्थशास्त्र विषयात एम. ए. केल्यानंतर त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेचे आष्टा कॉलेज, विलिंग्डन कॉलेज येथे अध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र अभ्यास संस्थेमध्ये संशोधन करून पी.एच.डी मिळवली. यासाठी त्यांना विद्यापीठ अनुदान मंडळाची शिक्षक शिष्यवृत्ती मिळाली होती. ‘राज्य सरकारांच्या उत्पन्न खर्चाचा अभ्यास’ या विषयात त्यांनी पी.एचडीसाठीचा संशोधनाचा विषय होता. ते, १९८२ मध्ये शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात रुजू झाले. प्रपाठक, प्राध्यापक आणि नंतर विभाग प्रमूख म्हणून ते निवृत्त झाले. ते, शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र परिषद, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष व संयोजक म्हणूनही काम पाहिले. शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषवले. विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाचे ते पहिले संचालक होते. निवृत्तीनंतर विद्यापीठाने त्यांना रा. ना. गोडबोले युनायटेड वेस्टर्न बँकेच्या अध्यासनावर प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. त्यांनी आजपर्यंत शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘अर्थशास्त्रीय संशोधनाची तोंडओळख’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ पथदर्शी मानला जातो. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले. यामध्ये अर्थशास्त्र परिषदेचा ‘डॉ. श्री. आ. देशपांडे जीवन गौरव पुरस्कार’, ‘कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार’ आदींचा समावेश आहे. डॉ. जे. एफ. पाटील यांनी गेल्या २० वर्षांहून अधिक काळ देशाच्या अर्थसंकल्पाचे सोप्या भाषेत विश्लेषण करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचवले. विविध आर्थिक आणि सामाजिक प्रश्नावर भूमिका मांडण्याचे काम त्यांनी केले. विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते.

डॉ. जे.एफ. पाटील यांच्या निधनामुळे अर्थशास्त्राच्या क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाचा लौकिक सर्वदूर पसरविणारा एक अर्थशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतातील एक महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी नाव कमावलेच, पण त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे नावही उंचावले. निवृत्तीनंतरच्या कालखंडातही ते सदोदित कार्यरत राहिले. शिवाजी विद्यापीठाचा साठ वर्षांचा इतिहास ग्रंथबद्ध करण्यासाठी नियुक्त समितीचे ते एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांनी हे काम पूर्ण करून विद्यापीठाकडे सुपूर्द केले आहे. त्यांच्या अर्थशास्त्रातील आणि शिक्षणातील योगदानाचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

डॉ. जे. एफ. पाटील माझे गुरू होते. त्यांनी खऱ्या अर्थाने मला घडवले. सामाजिक बांधिलकीतून अर्थशास्त्राचा अभ्यास आणि संशोधन करणारे विद्यार्थी त्यांनी घडवले. महाराष्ट्र एका सामाजिक जाणिव असरणाऱ्या अर्थतज्ज्ञाला मुकला आहे.
- प्रा. डॉ. विजय ककडे