घंटागाडी दारात तरीही कचरा रस्त्यातच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घंटागाडी दारात तरीही कचरा रस्त्यातच
घंटागाडी दारात तरीही कचरा रस्त्यातच

घंटागाडी दारात तरीही कचरा रस्त्यातच

sakal_logo
By

rat9p22.jpg
L67556
चिपळूणः कचरा टाकू नये, असा फलक लावलेल्या ठिकाणीच कचऱ्याची पिशवी टाकण्यात आली आहे.
rat9p23.jpg
67557
चिपळूणः रस्त्याशेजारी टाकण्यात आलेला कचरा.
---------
चिपळुणातील स्वच्छतेला हरताळ
घंटागाडी दारात तरीही कचरा रस्त्यातच; बेशिस्तीला हवा चाप
चिपळूण, ता. ९ः काही बेशिस्त नागरिकांनी चिपळूण शहराला कचरा डेपो करून सोडले आहे. नगर पालिकेतर्फे शहरातील प्रत्येक प्रभागात दरदिवशी कचरा संकलन करणारी घंटागाडी फिरते तरीही काहीजण आपल्या घरातील कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून तो मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणी, नद्या, नाले, गटारात, मोकळ्या जागेत, इमारतीच्या आवाराबाहेर फेकत असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर अनेकजण कचरा रस्त्याशेजारी टाकण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शासनाच्या स्वच्छ भारत अभियानालाच हरताळ फासली जात आहे. या संदर्भात सोशल मीडियातूनही प्रचंड चीड व्यक्त करताना काही सुज्ञ व जागरूक नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
गतवर्षी चिपळूण शहरात आलेल्या महापुरानंतर शहरात प्लास्टिकसह अन्य कचऱ्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. नगर पालिकेमार्फत स्वच्छ व सुंदर शहर व्हावे, नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, रोगराई पसरू नये, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबरोबरच ‘स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान’ राबवले जात आहे. याशिवाय यापुढे ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रमही राबवण्यात येणार आहे. काही सामाजिक संस्थाही त्यासाठी हातभार लावत आहेत. शहरातील घरोघरी साठणारा कचरा संकलन करण्यासाठी दररोज सकाळी व सायंकाळी घंटागाडीही फिरते. प्रशासनाने शहरातील विविध भागात येथे कचरा टाकू नये, असे ठळक अक्षरात फलकही लावले आहेत. दुर्दैव म्हणजे या फलकांच्या पायथ्याशीच कचऱ्याने भरलेल्या पिशव्या राजरोसपणे फेकल्या जात आहे. पालिकेच्या घंटागाड्या सकाळी फिरतात. त्यात आपली झोपमोड होऊ नये यासाठी काही नागरिक रात्रीच आपल्या घरातील कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधून तो चक्क अंधाराचा फायदा उचलत रस्त्यावर टाकत आहेत. अनेकजण आपल्या घरातील टाकाऊ खाद्यपदार्थ पिशवीत भरून इमारतींच्या बाहेर फेकतात. या पिशव्या भटकी कुत्री, गुरे तसेच गाढवं फाडतात आणि त्या इतरत्र घेऊन जातात. अनेकवेळा हा कचरा रस्त्यांवर अस्ताव्यस्त पाहायला मिळतो. अशा घटनांमुळे परिसरात दुर्गंधी पसरते तर डासांचे प्रमाणही वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. याबरोबरच शहरात भटकी कुत्री, गाढवे आणि उनाड जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे घरातील कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह जलदूत शाहनावाज शाह यांनीही केली आहे.
-----------
कोट
नव्याने आलेल्या नगर पालिकेच्या उपविधीत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्याप्रमाणे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. काहींकडून दंडही वसूल केला आहे; परंतु हे प्रमाण वाढल्यास कारवाईची मोहीम वाढवण्यात येईल. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर विचार केला जात आहे.
- महेश जाधव, आरोग्य निरीक्षक, चिपळूण नगर पालिका