रत्नागिरी ः 2 मोठ्या उद्योगांचे पुनरूज्जीवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः 2 मोठ्या उद्योगांचे पुनरूज्जीवन
रत्नागिरी ः 2 मोठ्या उद्योगांचे पुनरूज्जीवन

रत्नागिरी ः 2 मोठ्या उद्योगांचे पुनरूज्जीवन

sakal_logo
By

पान १ साठी

रत्नागिरीतील दोन मोठ्या उद्योगांचे पुनरुज्जीवन
---
६०० कोटींची गुंतवणूक; शिपयार्ड, वेरॉनमध्ये दोन हजार जणांना मिळणार रोजगार
रत्नागिरी, ता. ९ ः येथील बंद पडलेले दोन मोठे उद्योग पुनरुज्जीवित होणार आहेत. भारती शिपयार्ड आणि वेरॉन इंडस्ट्रीज या दोन कंपन्या महिनाभरात सुरू होणार आहेत. १४ वर्षांपूर्वी बंद पडलेली भारती शिपयार्ड कंपनी धनंजय मिश्रा यांच्या ह्युमन मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने घेतली; तर कोरोना काळात बंद पडलेली वेरॉन इंडस्ट्रीज ही गणेश तुरेराव यांच्या सियान अॅग्रो कंपनीने घेतली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये सुमारे ६०० कोटींची गुंतवणूक असून, दोन ते तीन हजार जणांना रोजगार मिळेल. स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रोजगारनिर्मितीच्या अनुषंगाने गेले काही महिने उद्योगमंत्री सामंत यांचे प्रयत्न सुरू होते. त्याला मोठे यश आले आहे. एमआयडीसी विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी दोन्ही कंपन्यांच्या उद्योजकांसह जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे आदी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, ‘‘भारती शिपयार्ड १४ वर्षांपूर्वी बंद पडली. अनेकांनी त्याचा पाठपुरावा केला. न्यायालयीन प्रक्रिया झाली; मात्र त्यामुळे दीड हजार जणांचा रोजगार गेला. ठेकेदार देशोधडीला लागले. मात्र, आता ह्युमन मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे धनंजय मिश्रा यांनी भारती शिपयार्ड कंपनी चालवायला घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका महिन्यात ते कंपनी ताब्यात घेऊन लवकरात लवकर सुरू करणार आहेत. एवढेच नव्हे, तर २५ लाखांचे ग्रामपंचायतीचे देणेही देण्याचे कंपनीने मान्य केले. देशोधडीला लागलेल्या ठेकेदारांची ५० टक्के रक्कम दिली जाणार असून, पहिल्या टप्प्यात २५० कामगार, त्यानंतर ५०० आणि नंतर एक हजार कामगार टप्प्याटप्प्याने कामावर घेतले जाणार आहेत. स्थानिकांना यात प्राधान्य दिले जाईल. संपूर्ण जमीन ताब्यात आल्यावर कंपनीचे विस्तारीकरण करून दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.’’
ते म्हणाले, ‘‘वेरॉन कंपनी ही गणेश तुरेराव यांच्या सियान अॅग्रो कंपनीने चालवायला घेतली असून, १०० कोटींची गुंतवणूक केली आहे. तेथेही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या उद्योजकांना कोणताही त्रास न देता सहज परवानग्या मिळाव्यात, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.’’

कोट
मी स्वत: मरीन इंजिनिअर आहे. माझ्या ह्युमन मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने सर्वांत उच्च बोली लावून भारती शिपयार्ड कंपनी ताब्यात घेतली. उद्योग मोठा व्हावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य देणार आहे.
- धनंजय मिश्रा, ह्युमन मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनी

कोट
वेरॉन इंडस्ट्रीज सुरू करून येथे अॅल्युमिनियम इंडस्ट्रीज विकसित करण्याचा प्रयत्न आहे. स्किल डेव्हलपमेंटद्वारे स्थानिकांना रोजगार देण्यावर भर राहील.
- गणेश तुरेराव, सियान अॅग्रो कंपनी