लॅंडलाईन होणार आता ‘स्मार्ट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लॅंडलाईन होणार आता ‘स्मार्ट’
लॅंडलाईन होणार आता ‘स्मार्ट’

लॅंडलाईन होणार आता ‘स्मार्ट’

sakal_logo
By

लॅंडलाईन होणार आता ‘स्मार्ट’

बीएसएनएलकडून नव्या पर्वाची तयारी; मोबाईलमुळे बदलले संवादाचे क्षेत्र

लीड
स्मार्टफोनच्या वाढत्या प्रभावामुळे ‘लँडलाईन’ इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. सर्वसान्यांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीचे फोन बाजारात आल्यामुळे लोकांमधील स्मार्टफोनची क्रेझ अधिकच वाढली आहे. यामुळे पूर्वी सगळ्यांच्या घरात असणारे लँडलाईन हळूहळू कमी होऊ लागले; मात्र आता लवकरच तुमच्या स्मार्टफोनसारखाच लँडलाईनही ‘स्मार्ट’ होणार आहे.
- निखिल माळकर
-----------------------
लँडलाईनचा होता जमाना
सिंधुदुर्गात पोष्ट, तार, यांच्या जमान्यामध्ये दूरसंचारची झालेली एन्ट्री क्रांतिकारी होती. त्याकाळात मोठी शहरे आणि त्यातही मोठ्या हस्तींकडे फोन असायचा. पुढे ‘ओएफसी’ अर्थात ऑप्टीकल फायबर केबलच्या नेटवर्कमुळे लँडलाईन सर्वदूर पोहोचले. बहुसंख्य गावांत बीएसएनएलची धून ऐकायला येऊ लागली. त्या काळात लँडलाईनसाठी दीर्घकाळ वेटींग असायचे. जेथे केबल पोहोचली नाही, त्या दुर्गम गावामध्ये वायरलेस फोन देण्यात आले.
--------------------
‘क्वाईन बॉक्स’ इतिहासजमा
लँडलाईनच्या काळात एसटीडी, पीसीओ व क्वाईन बॉक्सच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत होता. सर्वसामान्य एसटीडी, पीसीओ व क्वाईन बॉक्सचा संपर्कासाठी वापर करत होते; मात्र आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने क्वाईन बॉक्सची गरज कोणालाही राहिलेली नाही. घरातल्या प्रत्येक सदस्याच्या हातात मोबाईल आहे. मोबाईलच्या माध्यमातून एसटीडी, आयएसडी आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळते. स्वस्त आणि कोठेही मोबाईल वापरता येत असल्याने कॉईन बॉक्स संकल्पना कालबाह्य झाली आहे. यातून मिळणारा रोजगारही इतिहासजमा झाला आहे.
------------------------
रिचार्जचा नवा व्यवसाय
मोबाईल क्रांतीनंतर नाक्या-नाक्यावरचे एसटीडी बूथ आता दिसत नाहीत. त्यांची जागा आता मोबाईल रिचार्ज सेंटर्सनी घेतली आहे. दहा रुपयांपासून पाचशे रुपयांची रिचार्ज आता सर्वसामान्य व्यक्तीही सहज करतो. व्हॉईस रिचार्जबरोबरच आता डाटा रिचार्जही अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे रिचार्जचा मासिक खर्च अडीचशे रुपयांवर पोहोचला आहे; मात्र बंद पडलेल्या एसटीडी बूथचालकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.
-------------------------
मोबाईलची झेप
गेल्या २० वर्षांत मोबाईल क्रांतीने मोठी झेप घेतली. सिंधुदुर्गात तब्बल ९ लाखांहून अधिक ग्राहक झाले. यात बीएसएनएल ग्राहकांची संख्या ४ लाखांच्या पुढे गेली आहे. दूरसंचार या क्रांतीमुळे अनेकांची आर्थिक प्रगती झाली; पण भावनिक मंदीदेखील आल्याची भावना आहे. अवघे विश्‍व मोबाईलमुळे मुठीत आले; पण तीच माणसे घरात, कार्यालयात वावरताना कोरडी-कोरडी होताना दिसून येत आहेत. कट्ट्यावर किंवा हॉटेलात एकत्र जमताहेत; पण बोटे मोबाईलवर खेळत असतात. दूरसंचार क्रांतीची दुसरी बाजू म्हणजे प्रश्‍न कितीही वाढले तरी त्यांची उत्तरे गुगलवरूनही तातडीने मिळत आहेत.
------------------------
स्मार्ट फोनची उलाढाल
मोबाईल क्रांतीमुळे सर्वच किंमतीही आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. यात स्मार्ट फोनही आता अत्यावश्यक गरज निर्माण झाली आहे. चायना मेड थ्रीजी मोबाईल आता पाच हजारांच्या आत मिळू लागलेत. त्यामुळे विशेषतः युवा वर्गाची पसंती स्मार्ट फोनला राहिली आहे. याची वार्षिक उलाढाल जिल्ह्यात कोटीच्या पार गेली आहे. अगदी ५०-६० हजाराच्या महागड्या स्मार्टफोनपासून साडेतीन-चार हजाराच्या फोनपर्यंत खरेदी अगदी सहजगत्या होताना दिसत आहे. चोवीस तास व्हॉटस्अ‍ॅपवर ऑनलाईन असल्याने गावात घडलेल्या कुठल्याही घटनेची माहिती अवघ्या काही मिनिटांत सर्वदूर पोहोचते. कोकण-मुंबईशी कनेक्टेड असल्याने इथल्या बारीक-सारीक प्रत्येक घटनेची माहिती मुंबईकरांपर्यंत क्षणात पोहोचत आहे.
---------------------------
जग आले मुठीत
मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा घटक व गरजेची वस्तू बनला आहे. पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या तीनच मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, असे बोलले जात असे; परंतु आता मोबाईलदेखील माणसाची मूलभूत गरज बनली आहे. अगदी कमी कालावधीत या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने मानवाच्या आयुष्यातील महत्त्वाचे स्थान काबीज केले आहे. आज आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल जीवनावश्यक वस्तू झाली आहे. मोबाईल नसेल तर आपली अनेक कामे होत नाहीत आणि हल्ली तर मोबाईलशिवाय कामच होत नाही. कपडे खरेदी, फिरायला जाताना गाडी बुकिंग, नवीन माहिती घेण्यासाठी, डॉक्टरकडे नंबर लावण्यासाठी, पैसे पाठविण्यासाठी, जेवण मागविण्यासाठी मोबाईलच लागतो. आपल्या जीवनातील आविभाज्य घटक बनलेल्या मोबाईलचे हे फायदे आहेत.
---------------------
तोटेही तितकेच
मोबाईलच्या अतिवापरामुळे घराघरांतील व्यक्तींमधील संवाद संपत चालला आहे. पूर्वी घरात ज्या गप्पा मारल्या जात असत, त्या कमी होत आहेत. आज घरातील आई-वडील आणि मुले आपापल्या मोबाईलमध्ये मग्न झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे आपापसांतील संवाद कमी झाला आहे. शाळा-कॉलेजमधील मुलेसुद्धा मोबाईलचा गैरवापर करताना दिसतात आणि शाळेत तासाला बसून मोबाईलचा वापर केल्यामुळे मुलांमध्ये आत्मकेंद्रीपणा वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर मोबाईलमुळे वेळेचा अपव्यय होतो. आजकाल लहान मुलेदेखील आई-वडिलांचा मोबाईल हाताळताना दिसतात. अनेक लहान मुले अगदी हुशारीने मोबाईल हाताळत असतात, परंतु मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांनादेखील त्याची सवय लागते आणि मग अगदीच लहान वयात चष्मा लागणे वगैरे सारख्या गोष्टी होतात. काही वाईट प्रवृत्तीचे लोक या मोबाईलचा गैरवापरदेखील करू शकतात. काही लोक आपली अति गोपनीय माहिती जसे की, एटीएम पासवर्ड, ऑनलाइन बँकिंग पासवर्ड हे मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवतात, परंतु मोबाईल जर नकळत दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागला किंवा हरवला आणि नको त्या व्यक्तीच्या हातात गेला तर त्याचे गंभीर परिणाम मोबाईलधारकाला भोगावे लागतात. यातून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. सिंधुदुर्गही याला अपवाद नाही.
----------------------
चौकट
लँडलाईनचे रुपडे पालटणार
स्मार्टफोन्सच्या वाढत्या मागणीमुळे लँडलाईन फोन्सची मागणी दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे आता लँडलाईन फोनलाच स्मार्ट बनवणार असल्याचे संकेत बीएसएनएलने दिले आहेत. नुकताच याबाबतचा पहिला प्रयोग बीएसएनएलकडून सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत तिथल्या टेलिफोन एक्स्चेंजला ‘नेक्स्ट जनरेशन नेटवर्किंग’ (एनजीएन) परावर्तित केले जात आहे. लँडलाईन धारकांची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या पुन्हा एकदा रुळावर येण्यासाठी हा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. या अंतर्गत फायबर व जुन्या कॉपर लाईनच्या माध्यमातून लँडलाईन अधिक स्मार्ट करण्यात येणार आहे. याला ‘स्मार्ट इंटरनेट टेलिफोन’ म्हणतात. यात मोबाईल कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, एसएमएस अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसांत ही सेवा सिंधुदुर्गात सुरु होणार आहे. तत्पूर्वी प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर, पुणेसारख्या मोठ्या शहरात ही सेवा राबविली जात आहे. या ठिकाणी सुद्धा लोकांची मागणी लक्षात घेता त्याला प्रतिसाद मिळेल आणि खासगी वायफायला पर्याय म्हणून ही सेवा लोक स्वीकारतील, असा विश्वास बीएसएलएलच्या अधिकाऱ्यांना आहे.
------------------------
चौकट
असा आहे ‘स्मार्ट’ लँडलाईन!
सध्याच्या टेलिफोन एक्स्चेंजची कार्यप्रणाली नेक्स्ट जनरेशन नेटवर्किंगमध्ये यशस्वीरित्या परावर्तित झाल्यावर तुम्ही लँडलाईन फोनही एखाद्या स्मार्टफोनप्रमाणे वापरू शकता. यात लँडलाईनद्वारे करता येणारे व्हिडिओ कॉलिंग, टचड् आणि टेक्स्ट चॅटिंग युजर्स त्यांच्या लँडलाईन नंबरसाठी ठेवू शकणार आहेत. आवडती रिंगटोन, लँडलाईनवर आलेला कॉल तुमच्या मोबाईलवर होऊ शकतो. जेणेकरून तुम्ही घरी नसतानाही लँडलाईनचे फोन उचलू शकता. तुमच्या मोबाईलवर या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
.....................
जिल्ह्यातील दूरसंचाराचा टप्पा
* बीएसएनएल मोबाईल ग्राहक ४ लाख ४४ हजार ७३४
* लँडलाईन ५ हजार ३००
* इतर कंपन्यांचे ४ लाख
* ब्रॉडब्रँड १ हजार ८८९
* मोबाईल विक्रीची मासिक उलाढाल ८ कोटी
* रिचार्जची मासिक उलाढाल ८ कोटी
* महाप्रबंधक पद रखडल्याने भारत दूरसंचारच्या विस्तारीकरणाला मर्यादा
* बीएसएनएलची मोबाईल सेवा वारंवार विस्कळीत असल्याने इतर कंपन्यांच्या सेवेकडे ओढा
..................
कोट
67722
दिव्यांगांसह गावातील गरीब लोकांना गावांसह शहरातील टेलिफोन बूथ असल्यामुळे रोजगार उपलब्ध होत असे; मात्र आता मोबाईल क्रांतीमुळे त्याचा फटका बूथ चालकांना सहन करावा लागत आहे. टेलिफोन बंद झाल्यानंतर आम्ही रिचार्ज केंद्र सुरू केले होते; मात्र सध्याच्या डिजिटल युगात गुगल पे, पेटीएम यामुळे रिचार्जही प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मोबाईलद्वारे करतो. त्यामुळे आमच्या दुकानात कोणीही येत नाही आणि कर्ज काढून कोणत्याही मशीन आणले तरी मासिक हप्ता भरण्याएवढाही व्यवसाय होत नाही. त्यामुळे करायचे तरी काय, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.
- राजेंद्र केळूसकर, बूथ चालक, सावंतवाडी
................
कोट
67723
पूर्वी गावागावांत ग्रामपंचायत आणि नाक्यानाक्यावर बूथ केंद्रे चालू होती. त्यामुळे गावातील लोकांना शहरापासून संपर्क साधण्यासाठी त्याचा फायदा व्हायचा. त्यावेळी बीएसएनएलकडून विविध सुविधाही दिल्या होत्या; मात्र आता ते टेलिफोन लुप्त झाले आहेत. तर मोबाईलमुळे घराघरातील जिव्हाळा संपत चालला आहे. काही युवक मोबाईल अतिप्रमाणात वापरत असून परराष्ट्रातील गेम्स खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होत असून ते सैरभैर होतात. या नवनवीन तंत्रज्ञानामुळे लोकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. गावागावातील लोक अजून आर्थिक सक्षम झालेले नाहीत. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा फटका गोरगरीब शेतकऱ्यांवर होत आहे. प्रगतीच्या नावाखाली काहीजणांचा रोजगार हिरावला आहे.
- अण्णा केसरकर, सामाजिक कार्यकर्ते
....................
कोट
लँडलाईनचे ग्राहक कमी होत आहेत ही वस्तुस्थिती आहे; मात्र लँडलाईनच्या आधारे अनेक सुविधा दिल्या जाऊ शकतात. आधुनिकतेची जोड देऊन लँडलाईन स्मार्ट केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूरमध्ये ही यंत्रणा सुरू केली आहे. भविष्यात सिंधुदुर्गातही ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली आधुनिक यंत्रणा या ठिकाणी नाही. त्यामुळे प्रयत्न सुरू असून वरिष्ठस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
- रविकिरण जन्हू, उपमहाप्रबंधक सिंधुदुर्ग
--
ग्राफ
मोबाईल येताच लँडलाईन घटले
२००८ -१,८०००
मार्च २०१४ - ३,२५०००
२०१५ - ५३,४००
२०२२- ५३००