जनावरांचे विमा न काढणे शेतकऱ्यांचे अंगलट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनावरांचे विमा न काढणे शेतकऱ्यांचे अंगलट
जनावरांचे विमा न काढणे शेतकऱ्यांचे अंगलट

जनावरांचे विमा न काढणे शेतकऱ्यांचे अंगलट

sakal_logo
By

जनावरांचे विमा न काढणे अंगलट
केंद्राने बंद केली योजना , लप्मीत राज्य सरकार देणार भरपाई
चिपळूण, ता. ११ : साहेब, आम्ही स्वतःचा विमा काढत नाही गुरांचा कुठे काढणार, शेतकऱ्यांचा हा दुर्लक्षितपणा वा हतबलता आता त्यांच्या अंगलट आला आहे. जनावरांना लम्पी त्वचारोग संसर्गाचे संकट असताना केंद्र सरकारने पशुविमा योजना बंद केली आहे. त्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे. केंद्र सरकारकडून विम्यापोटी मिळणाऱ्या अवघ्या साडेपाच कोटीच्या थकीत हप्त्यासाठी ही योजना बंद झाली आहे.
लम्पी आजार झपाट्याने वाढत आहे. सुदैवाने रत्नागिरी जिल्ह्यात त्याचा संसर्ग नाही. मात्र जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी पशुविमा काढण्याकडे दुलर्क्ष केल्यामुळे ही योजना शासनाकडून बंद केली आहे. शेती आणि पशुपालन हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत मानले जातात. त्यामुळे आजारात किंवा अपघातात एक जरी पशु दगावल्यास शेतकऱ्याला त्याचा मोठा फटका बसतो. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून पशुधन विमा योजना सुरू केली होती. एखादा पशु दगावल्यानंतर शेतकऱ्याला शंभर टक्के भरपाई देण्याची तरतूद या योजनेत केली होती. मात्र विमा काढताना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि काही भार शेतकऱ्याने उचलणे आवश्यक होते. ही योजना सुरू झाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांपर्यंत पोहचले. मात्र आम्ही स्वतःचा विमा काढत नाही जनावरांचा कुठे काढणार अशी उत्तरे त्यांना मिळू लागली. योजना सुरू झाल्यानंतर कृषी विभागाकडून भरपाईचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आले. भरपाईच्या एकूण रकमेपैकी साडेपाच कोटी केंद्र सरकारकडून येणे गरजेचे होते ते न आल्यामुळे राज्य सरकारने ही योजनाच बंद केली.
पशुसंवर्धन विभागातर्फे अपुऱ्या मनुष्यबळासारख्या अनेक समस्यांना तोंड देत उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढत आहेत. संसर्गाने बाधितांची संख्या साडेतीन लाखांहून अधिक झाली आहे. मृत्युचे प्रमाण सुमारे साडेसहा टक्के आहे. लम्पीने जनावरांचा मृत्यु झाल्यास शासनातर्फे मदत दिली जाते. मात्र जनावरांच्या बाजारातील किमतीच्या मानाने ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. शासनाची विमा योजना सुरू राहिली असती तर विमा रकमेतून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून निघाले असते.
.................
कोट
पशुविम्याचे महत्त्व शेतकऱ्यांच्या लक्षात येवून पशुविमा काढण्याचे प्रमाण वाढले असते तर शेतकऱ्यांचे नुकसान वाचले असते. शासनाने बंद केलेली पशुधन विमा योजनाही पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. लम्पी आजाराने जनावराचा मृत्यु झाल्यास त्याला शासनाकडून भरपाई मिळणार आहे.
- डॉ. वसंत बारापात्रे , पशुवैद्य अधिकारी चिपळूण पंचायत समिती
.................
चौकट
शासनाकडून मिळणारी भरपाई
गाय - 30 हजार
बैल - 25 हजार
वासरू - 15 हजार