संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान ५

मुख्य रस्त्याच्या अर्धवट कामाबद्दल रिक्षा संघटना आक्रमक
राजापूर : शहरातील मुख्य रस्त्याचे काम अनेक दिवस अर्धवट स्थितीत असल्याने सध्या लोकांसह वाहन चालक व दुकानदारांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेल्या खडीमुळे अपघातही होत आहेत. सहनशीलता संपल्याने अखेर या पार्श्‍वभूमीवर रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार व रिक्षा व्यावसायिकांनी सोमवारी नगर परिषद प्रशासनाची भेट घेतली. या वेळी मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांच्याशी चर्चा करताना तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली. लवकरच रस्त्याचे पेव्हर कार्पेट सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

कोट्यवधींच्या भंगार चोरीच्या तपासाला गती नाही
खेड : जिल्ह्यातील पंचतारांकित समजल्या जाणाऱ्या लोटे औद्योगिक क्षेत्रामधील दोन नामांकित कंपनीतील अंदाजे तीन कोटींचा भंगार चोरल्याची तक्रार स्थानिक रहिवासी वैभव विलास आंब्रे यांनी २० नाव्हेंबर २०२२ रोजी खेड पोलिस स्थानकात दाखल करून आज पंधरा दिवसांचा कालावधी लोटून गेला, तरी सुद्धा तपासाला फारशी गती मिळाली नसल्याचे दिसून येते. मग या चोरीत स्थानिक पुढारी नेमकं कोण कोण आहेत, याचीच चर्चा औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली असून पोलिसांनी या चोरीचे गांभीर्य ओळखून गती द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राजन साळवी उद्या एसीबीत हजर राहणार
राजापूर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालमत्तेबाबत नोटीस पाठवली आहे. राजन साळवी हे मंगळवारी (ता. १३) अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहे. एसीबीच्या नोटीसनंतर आमदार साळवी यांच्या समर्थनार्थ ठाकरे गट सरसावला आहे.

कोकण गौरव पुरस्कारासाठी आवाहन
खेड : लोटे परशुराम उद्योजक संघटनेच्या वतीने कोकण गौरव पुरस्कार गेली काही वर्षे दिला जातो. विविध क्षेत्रात कोकण विभागात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तीला आणि संस्थेला प्रत्येकी एक असे एकूण दोन पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे उद्योजक संघटनेने ठरविले आहे. या वर्षी उद्योजक संघटनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात “कोकण गौरव पुरस्काराचे” वितरण करण्यात येणार आहे.
कोकण गौरव पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची आणि संस्थेची निवड व्हावी म्हणून उद्योजक संघटनेने अर्ज मागविलेले आहेत. कोकणात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला आणि संस्थेला पुरस्काराचा प्रस्ताव (माहिती आपल्या आवश्यक फोटो सर्टिफिकेटसह) उद्योजक संघटनेकडे सादर करता येईल. समाजातील कोणतीही व्यक्ती इतरांच्या माहितीसह शिफारस पाठवू शकते. स्वतः व्यक्तीनेच किंवा संस्थेनेच प्रस्ताव पाठवले पाहिजे अशी अट नाही. ह्या पुरस्कारची निवड तज्‍ज्ञ व्यक्तीच्या माध्यमातून केली जाते. ३० डिसेंबर २०२२ पर्यत पुरस्कारासाठी माहिती संघटनेच्या पत्त्‍यावर पाठवावी. मानपत्र, १५००० रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्री॑फळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेल्या सात वर्षांत विविध मान्यवरांना या कोकण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोकण गौरव पुरस्कारासाठी व्यक्ती आणि संस्थांनी आवश्यक ती माहिती किंवा प्रस्ताव लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन, उद्योग भवन, पी-४०, लोटे परशुराम, ता. खेड, जि. रत्नागिरी, या पत्त्‍यावर पाठवावेत असे आवाहन लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री. कुंदन मोरे यांनी केले आहे.


महामार्गाचे चौपदरीकरण जलदगतीने काम पूर्ण करा
मुंबई : मुंबई- गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावीत. महामार्गावरील अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करुन जनतेला तातडीने दिलासा द्यावा अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिका-यांसमवेत सविस्तर आढावा घेतला. या वेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा क्र. १, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा क्र.२, आदी रस्त्याची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणचे कामच्या सद्यस्थितीच्या कामाबद्दल आढावा घेतला. ही सर्व कामे तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने जलदगतीने पूर्ण करण्यात येतील याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करून अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या. या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्यादृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.

चिपळुणातील सहा जनावरांचा लम्पीने बळी
चिपळूण : राज्यात हाहाकार माजवलेल्या लम्पी आजाराने चिपळूण तालुक्यातील सहा जनावरांचा बळी घेतला आहे. कोसबी, फुरूस, अलोरे, आंबेत वारेली व हडकणी गावातील प्रत्येकी एक पशुधन या आजारामुळे दगावलेले असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यामुळे येथील पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून, लम्पीसदृश जनावरांवर तत्काळ उपचार सुरू केले आहेत. तसेच तालुक्यात ३० दिवस ८०६ जनावरांना लम्पीची लसही दिली असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी बारपात्रे यांनी दिली.