
खोपोली एसटी स्थानक दुर्लक्षित
खोपोली एसटी स्थानक दुर्लक्षित
द्रुतगती मार्गामुळे बस थेट लोणावळ्यात
खोपोली, ता. ११ ः द्रुतगती महामार्ग निर्मितीपूर्वी कर्जत आगारअंतर्गत असलेल्या खोपोली एसटी स्थानकाचे अनोखे वैभव होते. द्रुतगती मार्ग कार्यान्वित झाल्यावर हे वैभव हळूहळू लयास आले आहे. लांबपल्याच्या बहुसंख्य एसटी द्रुतगती मार्गावरून थेट लोणावळ्याला जात असल्याने बस स्थानकाच्या दुरवस्थेकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे. अनेक वर्षांपासून एसटी स्थानकातील कॅन्टीन बंद आहे. निवाराशेड, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी पुरवठ्याकडेही परिवहनचे दुर्लक्ष होत आहे.
पाच वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार सुरेश लाड यांच्यामार्फत, एसटी महामंडळ व परिवहन विभागाकडे बस स्थानकाच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी पाठपुरावा केला गेला. त्यानंतर खोपोली एसटी स्थानकांच्या नूतनीकरणाचे काम मंजूर झाले, या कामासाठी परिवहन विभागाने ४० लाख निधी मंजूर केला व आमदार सुरेश लाड यांनी आमदार निधीतून अतिरिक्त १५ लाखांचा निधीला मंजुरी दिली. यात स्थानक परिसरात कॉक्रिटीकरण, नवीन निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, नवीन आसन व्यवस्था व पंखे आदी कामांचा समावेश होता. मात्र चार वर्ष उलटले तरी स्थानकात काँक्रिटीकरणाचे काम सोडले तर अन्य कोणतीही कामे झालेली नाहीत. तुटलेली आसन व्यवस्था, बंद पंखे, मोडकळीस आलेले निवारा शेड, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, स्वच्छतागृहामधील अस्वच्छता आदी समस्या जैसे थे कायम आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचे खोपोली प्रवासी संघटना, विविध सामाजिक संस्थेकडून सांगण्यात आले.
लांबपल्ल्याच्या गाड्या थेट लोणावळ्यात
वर्तमान स्थितीत मुंबई, ठाणे येथून पुणे, नगर, सोलापूर, सातारा सांगली, कोल्हापूरकडे जाणाऱ्या पन्नास टक्क्यांहून अधिक गाड्या द्रुतगती महामार्गावरून सरळ लोणावळा येते जातात. अनेक गाड्या खोपोलीमार्गे जाणे अपेक्षित असतानाही चालक-वाहक खोपोलीसाठी थांबा नाही, असे सांगून प्रवाशांना बसण्यास मनाई करीत असल्याचा अनुभव पनवेल स्थानकांतील प्रवाशांना नेहमीच येतो.
--
एसटी स्थानकातील समस्या
खोपोली एसटी स्थानकात कॅन्टीन बंद असल्याने विकतचे पाण्याशिवाय येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नाही. एसटी स्थानकातील एका बाजूला कायम खासगी गाड्या उभ्या केल्या जात असल्याने तो त्यांच्यासाठी आरक्षित आहे का, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. अपुर्या जागेमुळे बस स्थानक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते.