
महिलेची ऑनलाईन 80 हजाराची फसवणूक
पान १ साठी
शिक्षिकेची ऑनलाइन
८० हजारांची फसवणूक
---
शिकवणीचे शुल्क देण्याच्या बहाण्याने घेतला पासवर्ड
रत्नागिरी, ता. ११ : खासगी शिकवणीचे ऑनलाइन शुल्क देण्याच्या बहाण्याने भामट्याने शिक्षिकेच्याच खात्यातील ८० हजार रुपये हातोहात लांबविले. येथील नजीकच्या खेडशी येथे हा प्रकार घडला असून, ग्रामीण पोलिस ठाण्यात एका संशयित भामट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी सात ते साडेसातदरम्यान ही घटना घडली. याबाबत दीप्ती दत्ताराम साबळे (वय ३२, रा. कस्तुरी निवास, खेडशी श्रीनगर, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः दीप्ती साबळे या खासगी शिकवणी घेतात. शुक्रवारी प्रवीणकुमार याने साबळे यांना फोन केला. आपली दोन मुले क्लासला प्रवेश घेणार आहेत. त्यांचे शुल्क भरण्यासाठी मी तुम्हाला ऑनलाइन दोन रुपये पाठवतो. तुम्ही मिळाले की सांगा. तेव्हा प्रवीणकुमार याने पाठवलेले दोन रुपये जमा झाल्याचे साबळे यांनी सांगितले. यातून त्याने साबळे यांचा विश्वास संपादन केला.
प्रवीणकुमार याने प्रवेश शुल्काची रक्कम असलेला मेसेज व लिंक टाकून ती क्लिक करून पासवर्ड टाकायला सांगितला. साबळे यांनी पासवर्ड टाकल्यावर प्रवीणकुमार याने साबळे यांच्या खात्यातील ७९ हजार २४० रुपये ऑनलाइन आपल्या खात्यात जमा करून त्यांची आर्थिक फसवणूक केली. तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी प्रवीणकुमारविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
माहिती देऊ नका
आपल्या बॅंक खात्याची कोणतीही गोपनीय माहिती, पासवर्ड अनोळखींना देऊ नका, असे जिल्हा पोलिस दलाकडून वारंवार आवाहन केले जात असते. तरीही काही महिन्यांपासून जिल्ह्यात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढतच आहेत. नागरिकांनी अजूनही सावध राहून अशी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिस दलाने केले.