
रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले
रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले
डहाणूतील स्थिती; वन विभागाने परवानगी न दिल्याने अडले
डहाणू, ता. ११ : डहाणू तालुक्यातील वाणगाव रेल्वे फाटक क्रॉसिंग उड्डाणपुलाचे काम वन विभागाच्या परवानगीअभावी रखडले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, वाहतूकदार आणि रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच रेल्वे फाटक ओलांडण्यासाठी वळसा घालावा लागत आहे.
वाणगाव रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावरील चिंचणी चारोटी रस्त्यावरील वाणगाव रेल्वे क्रॉसिंग फाटकावर ५७ कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचे बांधकाम चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. या रेल्वेक्रॉसिंग उड्डाणपुलाची लांबी ८०० मीटर असून रुंदी आठ मीटर आहे. यासाठी लागणारा ५० टक्के निधी राज्य सरकारने; तर ५० टक्के निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. पण उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याची जमीन ही वनखात्याची आहे. त्यामुळे १९८९ च्या वन अधिसूचनेप्रमाणे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र ती घेतली गेली नाही त्यामुळे डहाणू वनविभागाने पुलाच्या बांधकामावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम जून २०२२ पासून बंद पडले आहे; तर बांधकाम विभागाने वन विभागाची परवानगी घेऊन हे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. वाणगाव रेल्वे क्रॉसिंग फाटकासह पश्चिमेकडील पाचशे मीटर लांबीचे उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आलेले आहे; तर पूर्वेकडील बांधकाम पूर्णपणे रखडलेले आहे. या उड्डाणपुलावर सार्वजनिक बांधकाम खात्याने २० कोटी रुपये खर्च केले आहेत.
नवीन प्रस्ताव सादर
उड्डाणपूलाचे काम सुरू असलेला, २५ मीटर रुंदीचा रस्ता हा १९८० पूर्वीचा आहे. त्यामुळे तो वनविभागाच्या कक्षेत येत नाही. ही जमीन १९७८ मध्ये वन विभागाने महसूल विभागाकडे वर्ग केली असून आदिवासी शेतकऱ्यांना नवीन शर्तीवर शेतीसाठी दिली आहे. त्याचा सातबारा ही उपलब्ध आहे. पण वनविभागाने हरकत घेतल्यानंतर, सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि जिल्हाधिकारी यांनी पुलाच्या बांधकाम परवानगीसाठी पाठविलेले दोन प्रस्ताव वनविभागाने फेटाळून लावले. यामुळे याबाबतचा तिसरा प्रस्तावही पाठविण्यात आला असून, तो डहाणू वन विभागामार्फत मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर याला परवानगी मिळाल्यावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय जाधव यांनी सांगितले.
--
पुलाचा प्रवास असा
- पुलाची लांबी
८०० मीटर
--
- पुलाची रुंदी
८ मीटर
--
आतापर्यंत झालेले काम
५०० मीटर
--
प्रस्तावित एकूण खर्च
५७ कोटी रुपये
--
झालेला खर्च
२० कोटी रुपये