
सीमाप्रश्न नेमका कोणाच्या हिताचा?
67974
राजू मसुरकर
सीमाप्रश्न नेमका कोणाच्या हिताचा?
राजू मसुरकर ः राजकारण्यांनी भान ठेवावे
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः सर्व राजकीय मंडळी पडद्यामागचे कलाकार असतात. सर्वसामान्यांना पुढे करून सीमावाद, प्रांतवाद, भाषावाद, धर्मवाद, जातिवाद या गोष्टींना खतपाणी घालून ते पेटते ठेवतात आणि आपण मात्र आराम खुर्चीवर बसून टीव्ही पाहत असतो. आपण कोणाशी आणि कशासाठी लढतोय, भांडतोय? यातून काय निष्पन्न होणार? आपल्या अशा वागण्यामुळे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या मनावर काय परिणाम होत असणार? याचा विचार नागरिकांनी करावा. राजकीय मंडळींनी हे प्रश्न न सुटण्यासाठीच राजकारणासाठी ठेवले आहेत, याचे भान ठेवावे, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी पत्रकातून व्यक्त केले.
त्यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, आपल्या जीवाची पर्वा न करता सीमेवर राहून देशाला संरक्षण देणारे आपल्या देशाचे सैनिक वेगवेगळ्या राज्यांतील तसेच विविध जाती, धर्मातील असतात. स्वतःच्या जीवाची परवा न करता शत्रूशी लढताना बलिदानाला सामोरे जातात. त्यांच्या बलिदानाने कुटुंबावर केवढा मोठा आघात होत असेल, याची कल्पना आपण करू शकतात का? २६-११ चा मुंबईवरील ताज हॉटेलवर परकीयांनी हल्ला केला, त्यावेळी देशातील व विविध राज्यांतील सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हे संकट दूर केले. हे माझ्या राज्यातील संकट नाही, मी का लढू, माझ्या जीवाचे बलिदान का देऊ, असा विचार सैनिकांनी केला असता तर महाराष्ट्र व मुंबईचे काय झाले असते? याचा विचार करावा. विविध पक्षांतील नेते मंडळी सर्वसामान्यांची माती भडकवत असतात. त्यापेक्षा ह्या मंडळींनी सीमेवर जाऊन लढून देशाचे संरक्षण करावे; अन्यथा देशाच्या मूलभूत गरजांसह शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा सल्लाही मसुरकर यांनी दिला आहे.