टुडे पान एक-कुडाळात सत्ताधाऱ्यांकडून पथविक्रेत्यांना त्रास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान एक-कुडाळात सत्ताधाऱ्यांकडून पथविक्रेत्यांना त्रास
टुडे पान एक-कुडाळात सत्ताधाऱ्यांकडून पथविक्रेत्यांना त्रास

टुडे पान एक-कुडाळात सत्ताधाऱ्यांकडून पथविक्रेत्यांना त्रास

sakal_logo
By

67975

कुडाळमध्ये पथविक्रेत्यांना त्रास

भाजपकडून आरोप; प्रशासनाच्या आडून सत्ताधाऱ्यांचा निशाणा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः येथील नगरपंचायतीच्या शिवसेना व काँग्रेस सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्थानिक पथविक्रेत्यांवर निशाणा साधला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेमुळे दर आठवडा बाजाराच्या करात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. सत्ताधारी नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ करण्यापेक्षा घट कशी होईल, हे पाहत आहेत. येत्या बुधवारच्या आठवडा बाजारामध्ये स्थानिक पथविक्रेत्यांना त्रास दिला गेला तर भाजप नगरसेवक गप्प बसणार नाहीत, असा इशारा येथील नगरपंचायत भाजप गटनेता विलास कुडाळकर यांनी दिला.
श्री. कुडाळकर यांनी पत्रकात म्हटले आहे, येथील नगरपंचायतीमध्ये शिवसेना व काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून नगरपंचायतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. उत्पन्नाचे स्त्रोत कमी करण्याकडे सत्ताधारी ताकद लावत आहेत. गेल्या सहा महिन्यात सत्ताधाऱ्यांकडून नगरपंचायतीच्या अजेंठ्यावर पथविक्रेते आणि त्यांच्यावर केली जाणारी कारवाई हा विषय आहे. पथविक्रेते हे स्थानिक नागरिक आहेत. त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मुळात नगरपंचायतीकडून या पथ विक्रेत्यांना कोणत्याही प्राथमिक सुविधा पुरविल्या जात नाहीत; मात्र त्यांच्याकडून कर आकारणी केली जाते. आठवडा बाजारात येणाऱ्या इतर गावातील व्यापाऱ्यांना सुद्धा त्रास दिला जातो. ठराविक लोकांचे ऐकून गावाचे निर्णय घेतले जातात. अशा निर्णयामुळे शहरातील कविलकाटे, डॉ. आंबेडकर नगर, नाबरवाडी, कुंभारवाडी, लक्ष्मीवाडी, मज्जिद मोहल्ला अशा शहरातील अनेक स्थानिक पथ विक्रेत्यांना गाव सोडून इतर ठिकाणी व्यवसाय करावा लागत आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी व्यवसाय करायला दिले जात नाही. मुळात शहराची बाजारपेठ आता विस्तारत आहे. त्याचा विचार केला गेला पाहिजे. ३० नोव्हेंबरला भाजपच्या नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या स्थानिक पथविक्रेत्यांवरील कारवाई विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर १ डिसेंबरला पान बाजार येथील नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यावेळी त्या नागरिकांनी स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका, अशी मागणी केली होती. मुळात पथविक्रेत्यांमुळे अनेक व्यवसाय चालतात तसेच आठवडा बाजारात कमी दरामध्ये भाजीपाला इतर साहित्य मिळत म्हणून ग्रामीण भागासह मोलमजुरी करणारे नागरिक खरेदीसाठी येतात. त्यांच्यामुळे इतर दुकाने चालतात; पण याच पथविक्रेत्यांना आठवडा बाजारादिवशी त्रास देण्याचे काम शिवसेना व काँग्रेसचे सत्ताधारी प्रशासनाच्या माध्यमातून करीत आहेत. अशा या आडमोटी धोरणामुळे शहरातील अनेक स्थानिक पथ विक्रेत्यांनी व्यापार सोडला तर बरेच जण इतर आठवडा बाजारामध्ये जाऊन व्यापार करून आपली उपजीविका चालवत आहेत. या पथविक्रेत्यांबाबत ठोस निर्णय घ्यायचा नाही आणि कारवाई करायची ही पद्धत कोणती? सत्ताधाऱ्यांकडून भाजी मार्केट उभारणीचे मार्केटिंग करण्यात आले; मात्र त्याचा अद्याप ठाव ठिकाणा नाही.
---
...तर गप्प बसणार नाही
फक्त ‘टार्गेट’ करून स्थानिक पथ विक्रेत्यांना त्रास देण्यापलीकडे सत्ताधाऱ्यांना काम धंदा नाही. यापुढील काळात जर स्थानिक पथविक्रेत्यांना त्रास दिला गेला तर भाजप नगरसेवक गप्प बसणार नाही हे लक्षात ठेवावे, असेही श्री. कुडाळकर यांनी पत्रकात म्हटले आहे.