ग्रामपंचायतीसाठी घरोघरी प्रचारावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतीसाठी घरोघरी प्रचारावर भर
ग्रामपंचायतीसाठी घरोघरी प्रचारावर भर

ग्रामपंचायतीसाठी घरोघरी प्रचारावर भर

sakal_logo
By

67978
कणकवली ः तालुक्यातील सांगवे गावात उमेदारांची घरोघरी प्रचार मोहीम.

ग्रामपंचायतीसाठी घरोघरी प्रचारावर भर

कणकवली तालुका; थेट सरपंचपदामुळे चुरस

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १२ ः ग्रामपंचायत निवडणुकीतील थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या निवडीसाठी आता घरोघरी प्रचाराची मोहीम सुरू झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लढत देणाऱ्या उमेदवारांनी घोषणापत्र, प्रचार पत्र जाहीर करून ते मतदारांना वाटले जात आहे. प्रस्थापिता विरोधातील मत व्यक्त होण्यासाठी विरोधक प्रचार मोहिमेत उतरले आहेत. प्रचारासाठी काही दिवस शिल्लक राहील्याने प्रचाराचा काउंट डाऊन सुरू झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रचारासाठी १६ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीमध्ये सुमारे ५२ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. थेट सरपंच पदासाठी ४९ ठिकाणी ११८ उमेदवार लढत देत आहेत. ३५२ सदस्य पदासाठी तब्बल ७३५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे गावागावात निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये प्रस्थापित सरपंचाविरोधात रान पेटवले जात आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे होत असतात. यात प्रामुख्याने वाडी-वस्तीवर जाणारे रस्ते, शुध्द आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा हे मुद्दे ऐरणीवर आहेत. वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना या नागरिकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. मात्र, काही ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापित असलेले विविध पक्षाचे कार्यकर्ते वर्षानुवर्षे ठाण मांडून बसल्याने गाव विकासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधक अशी लढाई सुरू झाली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात ठिकठिकाणी रान पेटवले जात आहे. सरपंच पदासाठी मोठी लढाई प्रत्येक गावामध्ये आहे. प्रचारासाठी प्रत्येक प्रभागात बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांना विविध पक्षाचे राजकीय नेते, पुढारी आपली बाजू मांडताना दिसत आहेत. बहुतांशी ठिकाणी गाव पॅनलमधूनच लढाई सुरू आहे. परंतु, खरी लढाई भाजप आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारांमध्ये आहे. तालुक्यात या खेपेस काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत फारशी दिसत नाही. मात्र, भाजपने बहुतांशी ग्रामपंचायत मध्ये आपल्या पक्षाचे पुरस्कृत उमेदवार दिले आहेत. त्यामुळे भाजप पुरस्कृत पॅनलमध्ये अगदी मोदींपासून राणे कुटुंबीयांपर्यंत सर्वांच्या प्रतिमा छापण्यात आले आहेत तर शिवसेना उद्धव ठाकरे गटांमध्ये बाळासाहेब ते आदित्य ठाकरेपर्यंत छबी छापण्यात आल्या आहेत. शिंदे गटाच्या पुरस्कृत उमेदवारांमध्ये ही मोदींपासून मुख्यमंत्री शिंदेंपर्यंत पत्रकावर छबी छापण्यात आली आहे. यामुळे प्रचार मोहीम जोर धरत आहे. अवघे काही दिवस प्रचाराला शिल्लक राहिल्याने सकाळी दहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत प्रचार मोहीम सुरू आहे. अनेक गावांमध्ये डिजिटल बॅनरच्या माध्यमातून उमेदवारांच्या छबी छापण्यात आले आहेत. विरोधकांकडून गावातील निकृष्ट बांधकाम, रखडलेल्या नळ योजना, नादुरुस्त रस्ते यावर नजर टाकण्यात आली आहे.
------------
चौकट
सोशल मीडियाचा वापर
प्रचारासाठी घरोघरी जाऊन प्रत्येक उमेदवार आपण ग्रामपंचायतसाठी काय करणार हे सांगत आहेत. यंदा सोशल मीडियाचा बऱ्यापैकी वापर करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध माध्यमातून सोशल प्रचार मोहीम सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोप या निमित्ताने होत आहेत. ग्रामपंचायतीला थेट अनुदान मिळाल्यापासून आणि थेट सरपंच निवड जाहीर झाल्यापासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठी लढाई पाहायला मिळत आहे.
------------
प्रचारातील मुद्दे
* शुद्ध नळपाणी पुरवठा
* गावातील पायावाटा
* नादुरूस्त बांधकामे
* गावातील रस्त्याची अवस्था
* वैयक्तीक लाभाच्या योजना